अमरावती : आगामी दीड महिन्यात नवीन तूर बाजारात विक्रीसाठी येणार आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली त्यावेळी तुरीला प्रतिक्विंटल ६ ते ७ हजार रुपयांचे भाव होते. शेतकऱ्यांकडील तुरीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि फेब्रुवारीपासून तुरीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. एप्रिल-मे महिन्यात तर तुरीचा दर थेट १२ हजारापंर्यंत पोहोचला होता. दरम्यान आताही तूर ११ हजार ६०० रुपयांपर्यंत आहे. मात्र शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारात दाखल झाल्यानंतर नेमका किती भाव मिळणार, हे महत्वाचे ठरणार आहे.
सोयाबीनच्या दरात सुधारणा
महिनाभरापूर्वी बाजारात नवे सोयाबीन दाखल झाले. मात्र मागील वर्षीपेक्षाही कमी दर मिळाला. दिवाळी समोर असल्यामुळे तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयाबीन हे हंगामातील पहिले पीक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची यापूर्वीच विक्री केली आहे. दरम्यान आता सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात चकाकी आली असून शुक्रवारी ११ नोव्हेंबरला येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४ हजार ८०० ते ४ हजार ९१५ रुपये दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वोच्च दर आहे.
हेही वाचा – वर्धा : बुडून मृत्यू नव्हे तर खूनच असल्याचे उघड; मुलानेच बापास…
हेही वाचा – अमरावती : फटाके सार्वजनिक मैदानात फोडा; प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेचे आवाहन
बाजारात उच्च दर्जाचे सोयाबीन विक्रीसाठी आल्यास ते बिजवाईचे (बियाण्याच्या दर्जाचे) म्हणून खरेदी केले जाते. सध्या बिजवाईच्या सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपयांपर्यंत मिळत आहे. बिजवाईचा दर मात्र तीन आठवड्यांपूर्वी ५ हजार २५० रुपये होता. त्यामध्ये आता प्रतिक्विंटल १५० रुपये घट आली आहे.