अकोला : अतिवृष्टीचा फटका व उत्पादनातील कमतरतेमुळे तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने ११ हजार ५०० रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. पहिल्यांदा तुरीला प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तुरीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच याचा लाभ होणार आहे.
गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका बसला. परतीच्या मुसळधार पावसामुळेदेखील तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली, तर मागणी वाढली. विदेशातूनदेखील तुरीची आयात कमी झाली आहे. त्यामुळे तुरीचे भाव नवनवीन विक्रम गाठत आहे. नवीन तूर बाजारात येण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी आहे. जिल्ह्यात तुरीला सर्वाधिक भाव मिळत असल्याने व इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त भाव असल्याने येथे तुरीची मोठी आवक होत असते. शेतकरी आपल्याकडील तूर विक्री करून मोकळे झाले आहेत.
शेतकऱ्यांकडे तूर नसल्याने बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाली आहे. मागणी वाढल्याने दरवाढ झालेली आहे. याचा लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे. यंदादेखील तुरीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात मोसमी पाऊस येण्यास उशीर झाला. अनेक भागाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी तुरीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.