नागपूर: एकीकडे महागाईची चर्चा असतानाच दुसरीकडे दिवाळीतील वसूबारसपासून लक्ष्मीपूजनापर्यंत मात्र नागपुरात तब्बल ५०० कोटी रुपयांहून जास्तची उलाढाल झाल्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली. यामध्ये इलेक्ट्राॅनिक वस्तू, वाहने, दागिन्यांच्या खरेदीला विशेष प्राधान्य देण्यात आले.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री जोरात झाली. त्यासाठी सकाळपासूनच विविध शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. शहरात दोन हजारांच्या जवळपास दुचाकी व एक हजाराच्या जवळपास चारचाकी वाहनांची विक्री झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा… दिवाळीत विजेची मागणी २३ हजार मेगावाॅटहून कमी.. हे आहे कारण..
सोने-चांदी, प्लाटिनमच्याही दागिन्यांना चांगलीच मागणी होती. मध्यंतरी सोन्याचे २४ कॅरेटचे दर प्रति १० ग्रॅम ६२ हजार रुपयांपर्यंत गेले होते. नंतर त्यात घट झाल्याने दागिन्यांची विक्रीही वाढली. शहरात तब्बल ३० टक्क्यांनी विक्री वाढल्याची माहिती रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दिली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही ग्राहकांनी विविध सराफा दुकानात सकाळपासूनच गर्दी केली होती. यंदा फ्रीज, स्मार्ट टीव्ही, मोबाईल, वाॅशिंग मशीनचीही खरेदी जोरात झाली. विविध कंपन्यांकडून सवलत देण्यात आल्याने त्याचाही चांगला परिणाम खरेदीवर झाला.
झेंडूची फुले १०० रुपये किलो
गोकुलपेठ, धरमपेठसह इतरही अनेक बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवडत झेंडूच्या फुलांचे दर तब्बल १०० रुपये किलो होते. बर्डीतील फूल बाजारात मात्र ५० ते ६० रुपये दराने फूल विकले जात होते. शेवंतीला ४० ते ५० रुपये पाव दर मिळाला. पांढऱ्या व लाल कमळाच्या फुलाची दहा ते वीस रुपयाला एक याप्रमाणे विक्री करण्यात आली.