अमरावती : राज्‍यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे सत्‍तारूढ आमदारांनी सभा, लोकार्पण सोहळे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सपाटा लावला आहे तर दुसरीकडे, विरोधकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यातच बडनेरा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

युवा स्‍वाभिमान पक्षाचे संस्‍थापक आमदार रवी राणा यांच्‍या विरोधात भाजपचे पदाधिकारी एकत्र झाले आहेत. तुम्‍ही आमदार नाही, तर सावकार निवडून दिला आहे. रवी राणा हे आयत्‍या बिळावरील नागोबा आहेत. कुठल्‍याही कामाचे श्रेय घेण्‍याची त्‍यांची धडपड सुरू आहे, अशी टीका माजी नगरसेवक आणि भाजपचे इच्‍छुक उमेदवार तुषार भारतीय यांनी केली आहे.

हेही वाचा – संघ शिक्षा वर्गाला स्वयंसेवक घडवणारी शाळा का म्हटले जाते?

बडनेरा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाच्‍या उद्घाटनप्रसंगी बोलताना तुषार भारतीय यांनी रवी राणांवर सडकून टीका केली. भारतीय म्‍हणाले, आम्‍ही भाजपचे एकनिष्‍ठ कार्यकर्ते आहोत. सत्‍ता आमचे ध्‍येय नाही, पण सत्‍तेशिवाय पर्याय नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. २००९ मध्‍ये आपण अचलपूरमधून निवडणूक लढण्‍याची तयारी केली होती. त्‍यावेळी ती जागा शिवसेनेसाठी सोडण्‍यात आली. तेव्‍हाही आम्‍ही आमच्‍याच ताटातले का काढून घेता असा प्रश्‍न केला होता. आम्‍ही किती काळ बुथ प्रमुख, सुपर वारियर म्‍हणून काम करीत राहायचे. गेल्‍या अनेक दशकांपासून कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. म्‍हणून सत्‍ता मिळाली आहे. भाजपमध्‍ये प्रवेशासाठी आता रीघ लागली आहे, पण कार्यकर्ता उपेक्षित ठेवला, तर नक्‍कीच रोष उफाळून येणार आहे.

रवी राणा यांनी बेलोरा विमानतळाचे श्रेय घेऊ नये, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यामुळे झाले आहे. रवी राणा यांनी स्‍वत:च्‍या मतदारसंघातील पांदन रस्‍त्‍यांकडे, अंतर्गत रस्‍त्‍यांकडे बघावे. राणांचे लक्ष केवळ निधीकडे आहे. कामांकडे नाही. रस्‍त्‍यांवर मोठे खड्डे पडले आहेत. मुलांना खेळायला मैदान नाही. अस्‍वच्‍छता पसरली आहे. डेंग्‍यूमुळे लहान मुलांचा मृत्‍यू होतो, तरीही हे गप्‍प आहेत. केवळ श्रेय घेण्‍याचे काम सुरू आहे, अशी टीका तुषार भारतीय यांनी केली.

हेही वाचा – अमरावती : शिवशाही बसला आग; जीवितहानी नाही

तुषार भारतीय म्‍हणाले, आता सध्‍या बडनेरा मतदारसंघात फलक लावण्‍याचा सपाटा सुरू आहे. पंधरा वर्षे तुम्‍ही प्रतिनिधित्‍व केले, तर आता फलक लावण्‍याची वेळ तुमच्‍यावर का येते. तुम्‍ही आतापर्यंत सत्‍तेत होतात. तुम्‍ही मतदारसंघासाठी काय केले. शहरात पहाटेपर्यंत पब कुणाच्‍या आशीर्वादाने सुरू आहेत, याचे उत्‍तर त्‍यांनी द्यावे.