देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर : रशिया आणि युक्रेनमधील वाद रोज चिघळत असल्याने भारतातील इतर राज्य आपल्या राज्यातील मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारकडून अद्याप तसा कुठलाही पुढाकार घेण्यात आला नसल्याने युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील बाराशे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, अशी माहिती युक्रेनमध्ये अडकलेला ‘एमबीबीएस’चा विद्यार्थी पवन मेश्रामने दिली.
पवन म्हणाला, युक्रेनमध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील जवळपास बाराशे विद्यार्थी अडकले आहेत. त्यात पुन्हा आंतरराष्ट्रीय विमानाचे दर वाढल्याने मायदेशी परतणे कठीण होत आहे. सध्या युक्रेनमध्ये जवळपास वीस हजार विदेशी नागरिक आहेत. यात अठरा हजार विद्यार्थी असून तीन हजार भारतीय आहेत. या तीन हजारांमधून विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशित जवळपास बाराशे विद्यार्थी एकटय़ा महाराष्ट्रातील आहेत. आमच्या विद्यापीठातील राजस्थान आणि बिहार येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्य सरकारकडून संपर्क साधला जात आहे. किती विद्यार्थी आहे, कुणाला मदत हवी याची माहिती घेतली जात आहे. मात्र, युक्रेनमध्ये वेगवेगळय़ा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील जवळपास बाराशे विद्यार्थी असतानाही आम्हाला मायदेशी परत येण्यासाठी अद्याप कुठलेही प्रयत्न केले गेले नाही, असेही पवन म्हणाला. युक्रेनमधील परिस्थिती रोज भयंकर होत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण असून भारतातील आमचे पालक चिंतेत आहेत. दर तासाला घरच्या लोकांकडून विचारणा केली जात आहे. मात्र, आम्ही निरुत्तर आहोत. येथील विद्यापीठाने आमचे ऑनलाईन वर्ग घ्यावे म्हणून आंदोलन करावे लागले. त्यानंतर आमची मागणी मान्य झाली. राज्य आणि केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आम्हाला मायदेशी परत न्यावे, अशी मागणी पवन याने केली.
भारतीय दुतावासाचे केवळ आश्वासन भारतीय दुतावास कार्यालयाला आम्ही सातत्याने संपर्क करीत आहोत. त्यांनी विमानाची व्यवस्था केली जाईल असे सांगितले. मात्र, अद्याप आम्हाला कुठलाही संदेश आलेला नाही, याकडेही पवनने लक्ष वेधले.