नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारित दुर्ग-गोंदिया-नागपूर दरम्यान तिसरा रेल्वे रुळ टाकला जात आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान येथील हावडा मार्गावरील १७ टक्के म्हणजे रोज २० प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यापूर्वीपासून गाड्या रद्द होत असल्याने नागपुरातून विविध ठिकाणी गेलेले प्रवासी तेथेच अडकले आहे. तर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी या मार्गावरील भाडे दुप्पट करत प्रवाशांची लूट सुरू केली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून रोज नित्याने ११७ मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या आणि बऱ्याच साप्ताहिक गाड्या धावतात. या मार्गावरून वीज प्रकल्पांना नित्याने कोळसा पुरवठा होतो. वीजनिर्मितीवर परिणाम होऊ नये म्हणून नित्याने कोळशाच्या मालगाड्या येथून काढल्या जात आहेत. परंतु ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान रोज ७ ते ११ मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या आणि १८ जोडी म्हणजे ३६ साप्ताहिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
हेही वाचा : बुलढाणा : ग्रामविकास अधिकारी महिला सरपंचांना म्हणाले, ‘खाणे’ तर आपला अधिकारच, मतदार चोरच
दरम्यान, त्यापूर्वीपासून तिसऱ्या रेल्वे रुळ टाकण्यासाठी प्रवासी रेल्वे गाड्या रद्द होत आहे. त्यामुळे नागपुरातून छत्तीसगडसह देशाच्या इतर भागात गेलेले प्रवासी परतीसाठी रेल्वे रद्द होत असल्याने अडकून पडले आहे. तर दुसरीकडे नागपुरात परतण्यासाठी त्यातील काही खासगी ट्रॅव्हल्स बससाठी चाचपणी करतात. परंतु, छत्तीसगड, गोंदिया, तिरोडातून नागपुरात येण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी भाडे दुप्पट केल्याने या प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. परंतु, प्रवाशांना किमान त्रास व्हावा म्हणून खूपच कमी संख्येने रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.
रेल्वे काय म्हणते?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर-दुर्ग विभागादरम्यान ३ हजार ४२५ कोटींच्या खर्चातून तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू आहे. त्यातील दुर्ग, पनियाजोब, बोरतवाल येथून दरेकसापर्यंत एकूण १२२.८ किलोमिटर मार्गावरील कामही पूर्ण झाले. इतरही काम लवकरच पूर्ण करण्याला गती दिली गेली आहे. त्यामुळे या रेल्वे रद्द कराव्या लागत आहेत. परंतु, प्रवाशांना कमी त्रास व्हावा म्हणून काळजीही घेतली जात असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.