राज्याच्या नागरी भागातील स्थिती, ग्रामीण भागातील प्रमाण ३३.१ टक्के

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण पाहणीतील चित्र

चंद्रशेखर बोबडे, नागपूर</strong>

‘सर्वासाठी घरे’ असे चित्र राज्यकर्ते रंगवत असले तरी त्याचे स्वरूप खरोखर कसे आहे, याचा प्रत्यय घरांच्या स्थितीबाबत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीतून येतो. राज्यात नागरी भागात २२.६ टक्के तर ग्रामीण भागात ३३.१ टक्के कुटुंबांकडे स्वतंत्र स्वयंपाक घर नसल्याचे आढळून आले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागाकडून निरनिराळ्या सामाजिक व आर्थिक विषयांवर नियमितपणे देशव्यापी सर्वेक्षण केले जाते. त्यात राज्यांचाही सहभाग असतो. या पाहणीच्या ७६ व्या फेरीत पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य व घरांची स्थिती या मुद्यांवर जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८ या  दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी ११,६६४ कुटुंबांची मते नोंदवण्यात आली. त्यात ४,६४४ कुटंबे ग्रामीण भागातील आणि ७,०२० कुटुंबे नागरी भागातील होती. विधिमंडळात सोमवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या ७६ व्या फेरीतील निष्कर्षांनुसार, राज्यातील ५२.८ टक्के घरांची स्थिती चांगली, ३९ टक्के  समाधानकारक तर ८.३ टक्के घरांची स्थिती वाईट आढळून आली. विशेष म्हणजे, वाईट घरांचे प्रमाण शहराच्या (५.७ टक्के) तुलनेत ग्रामीण भागामध्ये (१०.७ टक्के) अधिक आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या ९३ टक्के तर नागरी भागातील ६७ टक्के कुटुंबांकडे स्वमालकीची घरे आहेत. भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरांची टक्केवारी ग्रामीणमध्ये ४.१ टक्के व नागरी भागात ३१.३ टक्के आहे. ग्रामीण भागात २९ टक्के कुटुंबाची घरे १० ते २० वर्षे जुनी, २८ टक्के २० ते ४० वर्षे जुनी आणि १२ टक्के ४० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जुनी आहेत. नागरी भागात हे प्रमाण अनुक्रमे ३० टक्के, २६ टक्के व १० टक्के इतके आहे. स्वतंत्र स्वयंपाक घर नसलेली कुटुंबे ग्रामीण भागात ३३.१ टक्के तर नागरी भागात २२.६ टक्के आहेत. सांडपाण्याची व्यवस्था नसलेली कुटुंबे २४.३ टक्के(ग्रामीण) व २.२ टक्के (नागरी) आहेत.

आठवडय़ातून एकदाच पाणीपुरवठा

राज्यातील एकूण ७ टक्के कुटुंबांना आठवडय़ातून एकदाच पाणीपुरवठा होतो. त्यात ग्रामीण भागाचे  प्रमाण ७.१ टक्के तर नागरी भागाचे प्रमाण ६.८ टक्के आहे. दोन दिवसांतून एकदा पाणी मिळणाऱ्यांचे प्रमाण एकूण ११.२ टक्के आहे. शहराच्या (९ टक्के) तुलनेत हे प्रमाण ग्रामीण भागात (२२.८) अधिक आहे. ७३.५ टक्के कुटुंबांकडे पिण्याच्या पाण्याचा स्रोत घरात किंवा घराच्या परिसरात आहे. २१.५ टक्के कुटुंबांना २ कि.मी. वरून तर ५ टक्के कुटुंबांना त्यापेक्षा जास्त अंतरावरून पाणी आणावे लागते. ग्रामीण भागात आजही ४९.८ टक्के कुटुंबांमध्ये पाणी गाळण्यासाठी कापडाचा वापर केला जातो. शहरी भागात हे प्रमाण ३०.५ टक्के आहे.

Story img Loader