इंडियन प्रीमियर लिगच्या (आयपीएल) रॉयल चॅलेंज बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जाएन्ट संघात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. ही कारवाई नवाथे चौक परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोन्ही बुकी बनावट सॉफ्टवेअर व ॲपद्वारे सट्टा घेताना आढळून आले.
विनोदकुमार लक्ष्मीनारायण चांडक (४४) व तुषार मनोज चांडक (२९) दोघेही रा. स्वस्तिकनगर, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत. ते नवाथे चौक परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर रॉयल चॅलेंज बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जाएन्ट या संघात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाइलमधील गुगल क्रोममध्ये ‘ओलाबेट बेट ऑन द बेस्ट ऑड्स’ नामक गैरकायदेशीर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सट्टा घेत होते. याबाबत माहिती मिळताच विशेष पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी ते बेकायदेशीर ॲप आकाश चावरे रा. औरंगपुरा, अमरावती याच्याकडून घेतले असून त्याच्याकडेच आपण तो सट्टा उतरवित असल्याची कबुली दिली. त्यानुसार विशेष पथकाने आरोपी आकाश चावरे याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही.
हेही वाचा >>>बुलढाणा पालिकेच्या एकछत्री कारभाराला आमदारांचे आव्हान; जिल्हाकचेरीत ‘सीओ’ समवेत उद्या स्वतंत्र बैठक, कामांची घेणार झाडाझडती
विनोद व तुषारच्या मोबाइलमधील रेकॉर्डिंग चेक केल्यावर त्यामध्ये वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या कॉलनुसार आयपीएल क्रिकेट सामन्यावर जुगार खेळविण्यात येत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून ५ हजार ६१० रुपये रोख व दोन मोबाइल असा एकूण १ लाख ६५ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध फसवणूक व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सुनील लासूरकर, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, विनोद काटकर, सागर ठाकरे आदींनी केली.