गडचिरोली : नक्षलवाद्यांनी बेकायदेशीररित्या गोळा केलेली रक्कम बदलविण्यासाठी जाणाऱ्या दोन संशयित इसमांना पोलिसांनी अहेरी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून २७ लाख ६२ हजार रुपये जप्त करण्यात आले असून, त्यात २ हजाराच्या नोटांचाही समावेश आहे. रोहित मंगू कोरसा (२४, रा.धोडूर, ता.एटापल्ली) व बिप्लव गितीश सिकदर (२४, रा.पानावर, जि.कांकेर, छत्तीसगड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र सरकारने २ हजाराची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नक्षल्यांची कोंडी झालेली आहे. त्यामुळे खंडणीतून गोळा केली रक्कम बदलण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज दोघेजण मोटारसायकलने जात असताना अहेरी येथे पोलिसांनी नाकेबंदी करून दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २७ लाख ६२ हजार रुपये आढळून आले. त्यात १२ लाख १४ हजार रुपये किमतीच्या २ हजारांच्या ६०७ नोटा, १६ लाख ३६ हजार रुपये किमतीच्या ५०० च्या ३०७२ नोटा व १ हजार ४०० रुपये किमतीच्या २०० च्या ७ नोटांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान ही रक्कम नक्षलवाद्यांनी बदलण्यासाठी दिली असल्याचे दोघांनीही सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांवर ‘यूएपीए अ‍ॅक्ट’अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – नागपूर : बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना निकृष्ट नाष्टा

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक(अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested for exchanging naxal notes gad 260 ssb