नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडीतील निवासस्थाना जवळ दोन गुंडांनी दोन ऑटोचालकांना मारहाण केली. त्याच्या खिशातील रक्कम काढून पळ काढला. भरदिवसा आणि चक्क पालकमंत्र्यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून  कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट चित्र झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे शाखा पोलिसांनी दोनपैकी एका आरोपीला अटक केली. दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. असलम खान अयूब खान (२९, रा. इंद्रप्रगतीनगर, कोराडी) असे या आरोपीचे नाव आहे. बाजार चौक, सावनेर येथील रहिवासी अमित प्रकाश तांडेकर (२४) ऑटो चालक आहे. तो सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील महादुलाजवळ, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर त्यांचा प्रवाशी आॅटो घेऊन प्रवाशांची वाट बघत होता.

पालकमंत्र्यांच्या घराजवळील परिसरात पोलिसांचा मोठा ताफा लागलेला असता. त्यामुळे सुरक्षित परिसर अशी ओळख आहे. मात्र, सकाळी साडेदहा वाजता अमित तांडेकर व त्याच्या ओळखीचा आॅटोचालक मुसा ऑटो घेऊन प्रवाशांची वाट बघत होते. काही वेळाने येथे आरोपी असलम खान आणि त्याचा एक साथीदार मद्दाक (२७) हे दोघे दुचाकीने अमित तांडेकर याच्याजवळ आले आणि पैसे मागितले. परंतु, अमित याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. ‘तू आम्हाला ओळखत नाही का? आम्ही या भागातील दादा आहोत.

येथे धंदा करायचा असल्यास दर महिन्याला पैसे द्यावे लागतील’ असा दम दिला. तरीही अमितने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर  आरोपी असलम आणि मद्दाक यांनी अमितला हातबुक्कीने मारहाण करत त्याच्या खिश्यातून एकूण ७०० रुपये जबरी हिसकावले आणि पळून गेले. यासंदर्भातील तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने आरोपी असलम खान याची माहिती गोळा केली आणि शोध घेत त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेत एक मोठा लोखंडी चाकू आढळून आला. चाकू जप्त करत असलम खान याला पोलिसांनी ठाण्यात आणले. त्याची विचारपूस केली असता त्याने उपरोक्त ऑटोचालकाला लुटल्याची कबुली दिली. कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल, चाकू तसेच ३०० रुपयांची रोकड असा एकूण ११ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्याला अटक केली.

पालकमंत्र्यांच्या घराजवळील परिसराची सुरक्षा धोक्यात पालकमंत्री चंद्रशेख बावनकुळे यांच्या घराजवळील परिसरात नेहमी पोलीस कर्मचारी तैनात असतात. मात्र, गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कोणतेही प्रयत्न करीत नाहीत. सध्या गुन्हे शाखा तर सुपारी व्यापारी, तंबाखू व्यापारी, वाळू तस्कर, अवैध वाहतूक, जुगार अड्डे आणि दारुविक्रीसह अन्य अवैध धंदेवाल्यांकडून महिन्याकाठी पैसे वसूल करण्यावर भर देत आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.