नागपूर : नवीन घेतलेली कार शिकण्यासाठी दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा एक मित्र कार घेऊन बुटीबोरीतील बालभारती मैदानावर गेले. कार शिकत असताना अचानक वेग वाढवल्यामुळे कार जमिनीलगत असलेल्या विहिरीत पडली. यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फायर ब्रिगेडच्या मदतीने तिन्ही युवकांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सुरज सिद्धार्थ चव्हाण(३४) , साजन सिद्धार्थ चव्हाण (२७) आणि त्यांचा मित्र संदीप चव्हाण (२७) तीनही राहणार बुटीबोरी अशी अपघातामध्ये मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत.
बुटीबोरीचे ठाणेदार प्रताप भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटीबोरीत राहणारे सुरज चव्हाण यांनी नुकताच नवीन कार विकत घेतली होती. सुरजला कार चालवता येत होते. त्याने आपला भाऊ साजन चव्हाण आणि चुलत भाऊ संदीप चव्हाण यांना कार शिकवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास बुटीबोरीतील बालभारती मैदानावर कार शिकण्यासाठी तिनही युवक गेले होते. मैदानावर कुणीही नसल्यामुळे सुरजने आपला भाऊ साजन याच्या हातात कार दिली आणि तो शेजारी बसला. साजनला कार चालवता येत नसल्यामुळे हळूहळू तो कार चालवत होता. तर त्याचा मोठा भाऊ सुरज बाजूला बसून त्याला कार चालवणे शिकवत होता.
मैदानावरील जमिनीलगत असलेल्या विहिरीजवळ कार जात असल्याचे बघून सुरजने साजनला कार थांबवण्यासाठी ब्रेक दाबण्यास सांगितले होते. मात्र साजन ने ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबल्यामुळे कार वेगात जाऊन थेट विहिरीत कोसळली. विहिरीत जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे कार पाण्यात बुडाली आणि तिन्ही युवकाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या मैदानावर रात्रीच्या सुमारास कोणीही नसल्यामुळे ही घटना उघडकीस आली नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एका युवकाला या घटनेबाबत माहिती झाली. त्याने बुटीबोरीचे ठाणेदार प्रताप भोसले यांना माहिती दिली. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. विहिरीत खूप जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे कार मधील मृतांना काढणे शक्य नव्हते. त्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले. विहिरीतील पाणी कमी झाल्यानंतर तिनीही युवकाचे मृतदेह काढण्यात आले. उत्तरिय तपासणीसाठी तिन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.