गडचिरोली : १ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जमनी तेलामी (५२), देऊ आतलामी (६०) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथील जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता. १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजतादरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले. दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती.

हेही वाचा…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘तिनसो पार…’, स्टार प्रचारकांचा असा आहे दिनक्रम

दरम्यान, पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला. घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झाला होता. याप्रकरणी गावातील एकूण १५ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी (६०) व मुलगा दिवाकर तेलामी (२८) यांचा समावेश आहे.

हेही वाचा…अकोला : ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेकडे नव्या नियमामुळे पालकांची पाठ, हजारो जागा रिक्त राहणार

गुन्ह्याला दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची किनार

जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात आजही जादूटोणा सारखे प्रकार समोर येत असतात. दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे एका मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला होता. तेव्हापासून काही गावाकऱ्यांना जमनी आणि देऊ यांच्यावर जादूटोण्याचा संशय होता. त्यामुळे या हत्याकांडाला ‘त्या’ घटनेची किनार असल्याची चर्चा गावात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two burnt alive on suspicion of black magic at barsewada village in etapalli tehsil of gadchiroli district ssp 89 psg