लोकसत्ता टीम
अकोला : जलाशयांजवळ लहान मुले खेळत असल्यास पालकांनी सावध होण्याची गरज आहे. उन्हाच्या तप्त झळांपासून दिलासा मिळण्यासाठी थंडगार पाण्यात पोहण्याचा मोह लहान मुलांना होतो. मात्र, पोहणे येत नसल्यास मोठा अनर्थ देखील घडू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील दापुरा येथे कोलार नाल्यात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. समर योगेश इंगळे (वय १२) व दिव्यांशू राहूल डोंगरे (वय १४) अशी मृत बालकांची नावे आहेत.
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाल्याने प्रत्येक जण गारव्याच्या शोधात असतो. शरीराला गारवा मिळण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार पाण्यात पोहणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, पोहणे येत नसल्यास पाण्यात उतरू नये, असे म्हणतात. ते सत्य देखील असून पाण्याचा मोह जीवावर देखील बेतू शकतो. यास प्रकारची एक घटना अकोला जिल्ह्यातील दापुरा या गावात घडली. दोन चिमुकले आपल्या अन्य मित्रांसोबत नाल्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला.
समर इंगळे व दिव्यांशू डोंगरे हे दोघे आपल्या दोन मित्रांसोबत घराबाहेर गेले होते. ते खेळत असताना चारही मुले गावाशेजारील कोलार नाल्याजवळ गेले. उन्हाच्या झळा व नाल्यातील थंडगार पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह झाला. ते चौघेही जण नाल्यातील पाण्यात उतरले. नालाखोल असल्याने पाण्यामध्ये समर व दिव्यांशू बुडाले. त्यांना पोहता येत नव्हते. अन्य दोन मुलांनी ही माहिती तत्काळ जाऊन ग्रामस्थांना दिली. हा धक्कादायक प्रकार लक्षात येतात त्या मुलांच्या पालकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडलेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्या दोन्ही मुलांचा जीव गेला होता.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल गोपाळ, उपनिरीक्षक रवींद्र धुळे, सतीश सपकाळ, किशोर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. जलाशयांमधील पाणी प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.