लोकसत्ता टीम
नागपूर : आईवडील घरात नसताना तीन मुलांनी शेकोटी पेटवल्यामुळे घराला आग लागली. ही आग घरात पसरल्याने संपूर्ण घराने पेट घेतला. या आगीत ७ व ३ वर्षीय भावडांचा मृत्यू झाला. तर एक १० वर्षीय मुलगी घरातून पळाल्याने सुदैवाने वाचली. देवांश रणजित उईके (७) आणि प्रभास रणजित उईके (३) अशी मृतांची नावे आहे. ही घटना गुरुवारी रात्री १०.३० मिनिटांनी सेमिनारी हिल्स हजारीपहाड परिसरात घडली.
आणखी वाचा-चंद्रपूर : महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ‘प्रशासक राज’ आमदारांसाठी डोकेदुखी!
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रणजित उईके हे खासगी कंपनीत नोकरी करतात तर पत्नी दीपाली या वस्तीतील नातेवाईक महिलेच्या घरी गेल्या होत्या. यावेळी घरी मुलगा देवांश आणि प्रभास हे दोघे होते. शेजारी राहणारी १० वर्षीय मुलगी खेळायला देवांशच्या घरी आली. थंडी लागत असल्याने त्यांनी शेकोटी पेटवली. शेकोटीची आग घराला लागली. मुलीच्या लक्षात येताच तिने घरातून पळ काढला. मात्र, लहान भावामुळे देवांशला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे भावांचा घरातच होरपळून मृत्यू झाला.