नागपूर : उपराजधानीतील दोन मुलांना मेटान्युमोव्हायरस (एचएमपीव्ही)ची लागण झाल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत आढळले आहे. परंतु, या दोन्ही मुलांचे नमुने पुन्हा नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. गडचिरोलीतूनही चार संशयितांचे नमुने ‘एम्स’ला तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
नागपुरातील ‘मेडिट्रिना’ या खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेला एक ७ वर्षीय मुलगा व १४ वर्षीय मुलगी या दोघांनाही सर्दी व खोकला होता. ३ जानेवारीला या दोघांनाही ‘एचएमपीव्ही’ची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांचे नमुने नव्याने तपासणीसाठी ‘एम्स’च्या प्रयोगशाळेत पाठवले. दोन्ही रुग्ण आधीच या आजारातून बरे झाल्याची माहिती ‘मेडिट्रिना’ रुग्णालय प्रशासनाने दिली.
हेही वाचा >>>नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
घाबरण्याचे कारण नाही
‘एचएमपीव्ही’ची लागण झालेले दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून, ते शाळेत जात आहेत, अशी माहिती ‘मेडिट्रिना’ रुग्णालयाचे संचालक डॉ. समीर पालथेवार यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, दोन्ही संशयितांचे नमुने नागपूर ‘एम्स’ व एनआयव्ही पुणे या संस्थेत पाठवले आहेत. अहवालानंतरच आजाराबाबत स्पष्टता येईल. सध्या जिल्ह्यात एकही नोंदणीकृत रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
सप्टेंबर, नोव्हेंबरमध्येच तीन वृद्धांना बाधा
नागपुरातील ‘क्रिम्स’ रुग्णालयात सप्टेंबरमध्ये जबलपूरची (मध्य प्रदेश) ६१ वर्षीय महिला व नागपुरातील ७४ वर्षीय वृद्धेला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांनाही ‘एचएमपीव्ही’ असल्याचे निदान झाले. नोव्हेंबरमध्ये नागपुरातील ७९ वर्षीय वृद्धालाही हा आजार असल्याचे निदान झाले होते. तिघांनाही यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. योग्य उपचाराने रुग्ण बरे होतात, अशी माहिती ‘क्रिम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
हेही वाचा >>>बुलढाणा : शासकीय वसतिगृहेदेखील असुरक्षित! अधीक्षकाचा विद्यार्थ्यावर अत्याचार
नागरिकांनी खबरदारी घ्यावी आबिटकर
‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’ हे श्वसनाशी संबंधित विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्याकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत केले.