खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गुमगाव खदान गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील डीजे बंद करण्यावरून पोलीस आणि नागरिकांमध्ये वाद झाला. या वादातून पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याने मिरवणुकीत लाठीमार केला. त्यात एक युवक जखमी झाला. वाद चिघळू नये म्हणून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गावाला भेट देऊन लाठीमार करणाऱ्या दोन्ही पोलिसांना निलंबित केले. त्यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. मात्र, या घटनेमुळे गुमगावात तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा >>> “लोकशाहीसाठी भाजप व संघ धोकादायक,” संभाजी ब्रिगेडची टीका; महाविकास आघाडीला पाठिंबा
खापा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमगाव खदान येथे १४ एप्रिलला रात्रीच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेवर बंदी आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम आणि कर्मचारी गणेश बघनुरे यांनी डीजे बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, मिरवणुकीतील काही युवकांनी त्यांना विरोध केला. यातून पोलीस आणि नागरिकांमध्ये वाद झाला. पोलीस उपनिरीक्षक गेडाम आणि बघनुरे यांनी डीजे बंद करण्यासाठी बळाचा वापर केला. पोलिसांच्या मारहाणीत एक युवक जखमी झाला. त्यामुळे मिरवणुकीतील नागरिक चिडले. त्यांनी पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला. त्यामुळे गुमगावातील परिस्थिती चिघळली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पोलीस उपनिरीक्षक गेडाम आणि शिपाई बघनुरे यांना निलंबित केले. अप्पर अधीक्षक रमेश धुमाळ यांना दोघांच्याही प्राथमिक चौकशीचे आदेश दिले.
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करू
युवकाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निबंनाची कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कुणीही दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न समाज माध्यमातून केल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे.