नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण आणि येथील वाघ पर्यटकांना कधीच निराश करत नाहीत. अलीकडच्या काही वर्षांत तर अवघे कुटुंब पर्यटकांना एकत्रित दर्शन द्यायला लागले आहेत आणि आता तर बछड्यांनीही जणू स्वतंत्रपणे पर्यटकांना दर्शन देण्याचा चंग बांधला आहे.
या व्याघ्रप्रकल्पातील बेलारा परिसरात ‘वीरा’ या वाघिणीच्या दोन बछड्यांनी केलेली दंगामस्ती कॅमेऱ्यात चित्रफितीच्या रुपात कैद करण्यात वन्यजीवप्रेमी पराग बोपर्डीकर यांना यश आले. तर वन्यजीवप्रेमी अमीत खापरे आणि रणजित शास्त्री यांनी त्यांच्या विविध भावमुद्रा छायाचित्राच्या रुपाने कॅमेऱ्यात कैद केल्या.
हेही वाचा – चंद्रपूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट
चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोनअंतर्गत बेलारा पळसगाव गोंडमोहाळी जंगलात ‘वीरा’ ही वाघीण कायम पर्यटकांना भूरळ घालत असते. वीरा ही वाघीण ताडोबातील ‘जुनाबाई’ आणि ‘कमकाझरी’ यांचे अपत्य. गोंडमोहाडी पळसगाव क्षेत्रात तीचा नेहमीच वास राहीला आणि पर्यटकांना ती कायम भूरळ घालत आली आहे. मोठी झाल्यानंतर ‘झायलो’ या वाघासोबत ती पर्यटकांना दर्शन देऊ लागली. सात-आठ महिन्यांपूर्वी तीने दोन बछड्यांना जन्म दिला. त्यातला एक नर तर एक मादी वाघ आहे. पर्यटकांना कधीही तिने निराश केले नाही आणि आता तर ती बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देऊ लागली.
बछड्यांसोबत कधी पाण्यात दंगामस्ती करताना तर कित्येकदा पर्यटनाच्या मार्गावर ती बछड्यांसह दंगामस्ती करताना दिसून आली. आता हाच वारसा तिच्या बछड्यांनाही मिळाला. वाघीण शिकारीला गेली की तिचे दोन्ही बछडे दंगामस्ती करतात आणि हाच क्षण वन्यजीवप्रेमी पराग बोपर्डीकर यांनी अमीत खापरे व रणजित शास्त्री यांच्यासह कॅमेऱ्यात टिपला. यात ती कधी शांतपणे पहूडलेली तर कधी एकमेकांच्या अंगावर धावून जातानाचे क्षण पर्यटकांना मोहात पाडत आहेत. पहाटेच्या कोवळ्या उन्हात गुलाबी थंडीचा आस्वाद घेत त्यांची ही दंगामस्ती सुरू आहे.