यवतमाळ : राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालयाद्वारे येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव सुरू आहे. ऐन परीक्षेच्या काळात आयोजित केलेल्या या ग्रंथोत्सवाकडे ग्रंथविक्रेते, वाचक आणि विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गुरूवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले. मात्र ग्रंथोत्सव परिसरात पहिल्या दिवशी असलेला शुकशुकाट आज दुसऱ्या दिवशीही कायम होता.

राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० नुसार, जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पूर्वी ग्रंथालय संचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात यायचा. त्यावेळी ग्रंथोत्सव चार दिवसांचा राहायचा. दर्जात्मक कार्यक्रम व आयोजन यामुळे शाळा, विद्यार्थी, नागरिक आणि ग्रंथविक्रेत्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद असायचा. अलिकडे हा महोत्सव उच्च तंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय आयोजित करते. पूर्वी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात पुस्तक खरेदी व वाचन चळवळीला बळ मिळावे आणि अधिकाधिक नागरिक या ग्रंथोत्सवात सहभागी होतील, या हेतून शनिवार, रविवार अशा जोड सुट्ट्‌या बघून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात यायचे.

मात्र आता ग्रंथोत्सव उकरण्याकडेच विभागाचा कल असल्याचे प्रकर्षाने दिसते. आलेला निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपात ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्या जात असल्याची टीका होत आहे. गुरूवारी ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले तरी दोन दिवसांत निमंत्रितांशिवाय आणि नियोजित कार्यक्रमांसाठी आलेल्या श्रोत्यांव्यतिरिक्त फारच मोजक्या लोकांनी येथे भेट दिली. पूर्वी नगर भवन परिसरात आयोजित ग्रंथोत्सवात चार दिवसांत एक ते दोन लाख नागरिक भेट देत असत. तर ५० लाखांच्या जवळपास पुस्तकांची विक्री व्हायची. यावेळी मात्र असे कुठलेच आशादायी चित्र नाही. ग्रंथोत्सव डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या आवारात ‘ॲडजेस्ट’ करण्यात आला आहे.

केवळ १० स्टॉलची जागा आहे. प्रत्यक्षात शासकीय मुद्रणालयाचा एक व इतर पाच असे सहा ग्रंथ विक्रेत्यांचे स्टॉल लागले आहेत. त्यातील तीन ग्रंथविक्रेते अनुक्रमे बल्लारशहा, जळगाव, नागपूर येथून आले आहेत. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ग्रंथोत्सवाची इतकी वाईट अवस्था यापूर्वी कधीच अनुभवली नाही, अशी होती. येण्या-जाण्याचे भाडे, राहण्याचा व भोजनाचा खर्चही या ग्रंथोत्सवातून निघत नसल्याचे सांगितले. ग्रंथालय संचालनालयाचा ग्रंथोत्सव असून जिल्ह्यातील ग्रंथालयांचा सहभाग नसल्याचे उमेश दुपारते या ग्रंथ विक्रेत्याने सांगितले. जिल्ह्यात ३२५ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र दोन दिवसांत ३२५ नागरिकही येथे भेट द्यायला किंवा पुस्तक खरेदीसाठी आले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांना सातत्याने फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Story img Loader