लोकसत्ता टीम

यवतमाळ : ‘मुलीच्या लग्नात मामा असायला हवा’, हे शब्द प्रत्येक लग्नघरी हमखास ऐकू येतात. मामाशिवाय भाचीचे लग्न अपुरेच. मामाच्या घरी केळवणासाठी आलेल्या नववधूला मात्र आपल्याला गावी सोडायला येणारा मामा, सर्वांना कायमचा सोडून जाईल, असा विचारही कधी मनात आला नसेल. परंतु, नियोजित वधूच्या आयुष्यातून लग्नाआधीच तिचा मामा कायमचा हरपला. केवळ मामाच नाही तर लाडकी मामेबहिणही अपघातरूपी काळाने हिरावली. नियोजित वधू स्वतः जीवन-मरणाच्या दारात झुंजतेय.

झरी तालुक्यातील कारेगाव (पारोंबा) येथील वैष्णवी विलास पेंदोर (२३) ही सोमवारी पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथे मामाच्या घरी केळवणासाठी आली होती. मामा, मामी, भावंडांसोबत तिने लग्नाची स्वप्नं बघत दोन दिवस आनंदात घालविले. या कुटुंबातील मामा आणि मामेबहिणीसोबतचे हे क्षण तिच्या आयुष्यातले शेवटचे आनंदाचे क्षण ठरतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. कारण वैष्णवीला गावी सोडून देताना झालेल्या अपघातात मामा रामदास जलपत धुर्वे (५०) आणि मामेबहीण तृप्ती रामदास धुर्वे (२४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर स्वत: वैष्णवी गंभीर झाली आहे. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

केळवण आटोपून मंगळवारी दुपारी मामा आणि तृप्ती हे वैष्णवीला गावी सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले. पण मारेगाव (वन) ते केळापूर रस्त्यावर एक भरधाव आयशर ट्रक त्यांच्या दुचाकीवर आदळला. या भीषण अपघातात रामदास यांचा जागीच मृत्यू झाला. तृप्ती गंभीर जखमी झाल्याने तातडीने यवतमाळला हलवण्यात आलं, मात्र तिनेही उपचारादरम्यान प्राण सोडले.

वैष्णवी अत्यवस्थ अवस्थेत असून सध्या नागपूर येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर आयशर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. अपघातस्थळी पुरूष जागीच ठार झाला तर दोन्ही तरूणी विव्हळत होत्या. नागरिकांनी त्यांना तातडीने रूग्णालयात पोहचविले. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा आणि अपघातग्रस्त दुचाकीचे सुटे भाग विखुरले होते.

या अपघाताने पेंदोर आणि धुर्वे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांवर येवून ठेपलेल्या लग्नाच्या तयारीने गजबजलेलं घर आता शोकमय झालं आहे. बाप-लेकीच्या मृत्यूने हळहळणारे शोकाकुल नातेवाईक आणि वधूच्या प्रकृतीमुळे चिंतामग्न असलेल्या तिच्या कुटुंबाकडे बघून बघणाऱ्यांचे हृदयही पिळवटून निघत आहे. एका दुर्दैवी अपघाताने वधूच्या आयुष्यातून आनंद, आधार आणि रक्ताचं ममत्त्व हिरावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.