लोकसत्ता टीम
नागपूर: करोनाचा प्रकोप कमी होत असतानाच उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढल्याचे संकेत आहेत. मंगळवारी महापालिकेच्या मृत्यू विश्लेषण समितीला येथील दोन रुग्णांचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्याचे निदर्शनास आले.
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात झालेल्या बैठकीमध्ये ‘स्वाईन फ्लू’ने दगावलेल्या दोन्ही रुग्णांची सूक्ष्म माहिती घेतली गेली. त्यात दोन्ही रुग्ण ६० वर्षे वयावरील असून त्यांना ‘स्वाईन फ्लू’ सोबत इतर सहव्याधी होत्या. दोन्ही मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्यावर यावेळी शिक्कामोर्तब केले गेले. दगावणाऱ्यात एक स्त्री व एक पुरुष रुग्णाचा यात समावेश होता. दोघेही नागपूर महापालिका हद्दीतील रहिवासी होते.
आणखी वाचा-अकोला : कृषी विभागाच्या योजनांसंदर्भात समाजमाध्यमांवर अफवांचे पीक
१ जानेवारी २०२३ पासून शहरात ‘स्वाईन फ्लू’ मृत्यू विश्लेषण समितीच्या तीन बैठकी झाल्या. यामध्ये एकूण ४ ‘स्वाईन फ्लू’चे निदान झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले. त्यात तिघांच्या मृत्यूला ‘स्वाईन फ्लू’च जबाबदार असल्याचे तर एक मृत्यू इतर सहव्याधीने झाल्याचे पुढे आले. दरम्यान, १ जानेवारी २०२३ पासून शहरात ‘इन्फ्लूएन्झा एच १ एन १’ या आजाराचे एकूण १९ रुग्ण आढळले. त्यापैकी ४ रुग्ण नागपूर शहराबाहेरील होते. जानेवारी २०२३ मध्ये ८ रुग्ण, फेब्रुवारी २ रुग्ण, मार्च महिन्यात ३, एप्रिल महिन्यात ४ रुग्ण व मे महिन्यात २ रुग्ण आढळले. या रुग्णाच्या घरी व परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने संपर्कातील व्यक्तीचा शोध व परिसरात फ्लूसदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण व उपचार केले. मंगळवारी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, मेयोच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र खडसे, डॉ. नीलिमा वानखेडे, डॉ. शीतल मोहने उपस्थित होते.
मृत्यू विश्लेषण समितीकडून अवाहन
‘स्वाईन फ्लू’ मृत्यू विश्लेषण समितीकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या रुग्णांनी ‘फ्लू’ सदृश्य लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करावे. गर्भवती स्त्रिया, ६० वर्षांवरील सहव्याधी असलेले रुग्ण व ‘स्वाईन फ्लू’ उपचारात सहभागी असणारे वैद्यकीय कर्मचारी यांनी ‘इन्फ्लूएन्झा ए एच १, एच १’ प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. महापालिका केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. ‘स्वाईन फ्लू’चे निश्चित निदान झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करावेत. यामुळे ‘स्वाईन फ्लू’चा प्रसार व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात मदत होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक
-हात साबण व पाण्याने धुवा
-गर्दीमध्ये जाणे टाळा
-मुखपट्टी लावूनच घराबाहेर पडा
-खोकताना व शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा
-वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू, जागांना निर्जंतूक करा
-पौष्टिक आहारासह व्यायामावर लक्ष द्या
-हस्तांदोलन अथवा आलिंगन टाळा
-सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका