देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या कारणावरून देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथक कारवाई करीत आहे. आज बुलढाणा शहरातून दोघांना या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलीस यंत्रणांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या कारवाईचा निषेध करणाऱ्या ११ समर्थकांविरुद्ध शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. यामुळे कारवाईचा विस्तृत तपशील कळू शकला नाही. अकोला ‘एटीएस’च्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणले असता तिथे काही जणांनी गर्दी केली. या कारवाईचा निषेध करणाऱ्या ११ जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, देशविरोधी व्यक्तव्य करून पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज २७ सप्टेंबर रोजी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पुणे येथील घटनाक्रम संदर्भात कारवाईची मागणी केली.