नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना दोन मित्रांनी एका वर्गमैत्रिणीला प्रेमाची मागणी घातली. मात्र, तिने एकाला प्रेमासाठी होकार दिला तर दुसऱ्याला नकार दिला. त्यानंतर एकासोबत प्रेमविवाह केला. लग्नाच्या १० वर्षांनंतर जुना मित्र पुन्हा त्या मैत्रिणीला भेटला आणि त्यांच्यात सूत जुळले. त्यांनी आपापल्या संसारावर पाणी सोडून सोबत राहण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. दोन्ही मित्र आणि मैत्रिणीची समजूत घातली. महिलेनेही चूक झाल्याचे मान्य करून मित्राला सोडून पतीसोबत पुन्हा संसार थाटला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेश, आशिष आणि प्राजक्ता (काल्पनिक नाव) हे तिघेही बारावीपासूनचे वर्ग मित्र होते. त्यांनी अभियांत्रिकीच्या पदवीसाठी सोबतच प्रवेश घेतला. तिघांचीही चांगली मैत्री होती. मात्र, उमेश आणि आशिष दोघेही प्राजक्तावर एकतर्फी प्रेम करीत होते. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना उमेश आणि आशिषने प्राजक्ताला प्रपोज करीत प्रेमाची मागणी घातली. तिने काही दिवसांचा अवधी मागितला. त्यानंतर तिने उमेशला प्रेमासाठी होकार दिला तर आशिषची माफी मागून त्याला नकार दिला. उमेश आणि प्राजक्ताने प्रेमविवाह केला. तर त्याच वर्षी आशिषनेही लग्न आटोपून घेत आपापल्या संसारात रमले. उमेश पुण्यात मोठ्या कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरीवर लागला. उमेश-प्राजक्ताला दोन मुली झाल्या. तर आशिषही पुण्यातील एका मोठ्या आयटी कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरीवर लागला. दोन्ही कुटुंबांचा संसार सुरळित सुरु होता. लग्नाच्या काही वर्षानंतर प्राजक्ताला आशिष फेसबुकवर भेटला. दोघांनी एकमेकांची विचारपूस करीत कुटुंबाची माहिती घेतली. दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि संपर्कात राहू लागले.

हेही वाचा – जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा नवा निर्धार, नागपूर ते मुंबई संकल्प यात्रेला सुरुवात

जुन्या प्रेमाला फुटला अंकुर

प्राजक्ता आणि आशिष यांच्यात वारंवार भेटी होत गेल्या. यादरम्यान त्यांच्या जुन्या प्रेमाला अंकुर फुटला. दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आशिषने शिक्षण संस्थेची संचालक असलेल्या पत्नीला प्रेमप्रकरणाबाबत माहिती दिली तर प्राजक्तानेही पती उमेशला प्रेमसंबंधाची कल्पना दिली. आशिष आणि प्राजक्ताने पुण्यात वेगळे घर घेऊन सोबत राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघांचेही कुटुंब अस्ताव्यस्त झाले.

पुणे सोडले तर संपर्क कायम

प्राजक्ता आणि आशिषच्या प्रेमसंबंधामुळे कुटुंबियांमध्ये बदनामी होत होती. संसार वाचविण्यासाठी उमेशने गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पत्नी व दोन्ही मुलींसह नागपूर गाठले. पत्नीचे प्रेमसंबंध कमी होण्याऐवजी विरह सहन होत नसल्याने तिची चिडचिड वाढली. पुन्हा पुण्यात जाऊन आशिषकडे राहण्याची हट्ट करायला लागली.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय, गैरप्रकार रोखण्यासाठी भिन्न केंद्रांवर…

भरोसा सेलने सोडविला तिढा

पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे हतबल झालेल्या उमेशने दोन्ही मुलींच्या भविष्याचा विचार करून आणि संसार वाचविण्यासाठी भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांची भेट घेतली. समूपदेशक जयमाला डोंगरे यांनी प्राजक्ताचे समूपदेशन केले. सामाजिक बदनामी, मुलींच्या भावना आणि पतीच्या प्रेमाची जाणिव करून दिली. समूपदेशनामुळे प्राजक्ता हळवी झाली. ती लगेच आशिषचा नाद सोडण्यास तयार झाली. त्याच्याकडे असलेले काही छायाचित्र डिलीट करण्यास पोलिसांना मदत मागितली. पती आणि दोन्ही मुलींना मिठी मारुन पतीसोबत परत गेली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two family on the verge of destruction through a love triangle bharosa cell of nagpur helped adk 83 ssb