नागपूर : सागवान वृक्षाच्या तोडीला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या वनखात्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनक्षेत्रातील या घटनेत आदिवासींच्या जमिनीवरील सागवान वृक्ष देखील तोडण्यात आली.नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काही झाडे तोडण्याची परवानगी घेण्यात आली. मात्र, ही झाडे तोडताना आदिवासींच्या जमिनीवरील अतिरिक्त झाडे देखील तोडण्यात आली.

दरम्यान, आदिवासींच्या जमिनीवरुन सुमारे १४५ झाडे तोडण्यात आल्याची चर्चा वनखात्यात आहे. प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली हे अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर वृक्षतोडीची परवानगी देताना नियंत्रण राखण्यात अनियमितता आढळल्याने रामटेकचे सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र घाडगे आणि रामटेक व पारशिवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अतिरिक्त प्रभार) अनिल भगत यांना निलंबित करण्यात आले.

याबाबत २७ फेब्रुवारीला सायंकाळी नागपूर प्रादेशिकच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांनी हे आदेश दिले. जानेवारी महिन्यातच वनखात्याकडे अतिरिक्त वृक्षतोड झाल्याची तक्रार आली होती.या तक्रारीनंतर एक समिती स्थापन करुन चौकशी आदेश देण्यात आले. घटनास्थळावर पाहणी केल्यानंतर याठिकाणी झाडे तोडलेली आढळली. लाकडावर हातोड्याच्या खुणा देखील होत्या. त्यानंतर चौकशी समितीने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.

यानंतर निलंबनाचे आदेश देण्यात आले. दरम्यान, झाडे तोडल्यानंतरही सहाय्यक वनसंरक्षकांना लाकडावर हातोडा मारण्याचा अधिकार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लाकूड मोजल्यानंतर पंचनामा तयार केला जातो. मात्र, सहसा अधिकारी त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून वरील काम करून घेतात. समितीच्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर दोन्ही वनाधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी सांगितले.दरम्यान, या वृक्षतोड प्रकरणात अवैधरित्या २७ ट्रक सागवानाचा पुरवठा झाल्याची माहिती आहे. मात्र, याला अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर विभागात वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Story img Loader