लोकसत्ता टीम

वर्धा : एकीकडे जागतिक महासत्ता होण्याचा व मंगळवर वस्ती करण्याची दुदूंभी फुंकली जात असताना विज्ञानास वाकुल्या दाखविणारे भोंदूबाबा पण आहेच. हे बाबा आपले प्रयोग करीत पैसे उकळण्यास टपून असताना त्यांना सावज पण भेटत असल्याचे चित्र आहे. झाले असे की जादूटोणा केल्याने गुडघे दुखत असल्याचे येथील प्रकाश पुंडलिक शिंदे या ६५ वर्षीय ज्येष्ठास सांगण्यात आले. शिंदे यांच्या गुडघ्यास आरोपी बाबांनी तेल लावले. सोबतच एका ग्लासमधील पाणी मंत्राने भारले. प्लास्टिकची पोकळ नळी गुडघ्यास लावून लाल द्रव्य बाहेर काढले.

हे लाल द्रव्य अशुद्ध रक्त असून आता तुमचा पाय दुरुस्त करतो, असे सांगत मायाजाल टाकले. पैसे उकळले. मात्र दुसऱ्या दिवशी शिंदे यांचे पाय परत दुखायला लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परत दुसरे बाबा आरोपी आल्यावर त्यांना शिंदे यांनी घरात बोलावले. पाच हजार रुपये दिले. तेव्हा या आरोपीना शिंदे यांनी जूना व्हिडिओ दाखविला. तेव्हा मात्र बिंग फुटल्याचे पाहून आरोपी घाबरले. त्यांनी पूर्वी फसवणूक करणारे आमच्याच टोळीतील असल्याचे मान्य केले. तसेच ५० हजार रुपये पण परत केले. मात्र या टोळीकडून आणखी कोणाची फसवणूक होवू नये म्हणून पोलिसांना ११२ वर डायल करीत माहिती दिली. लगेच पोलीस चमू आली. आरोपीना बेड्या ठोकल्या.

हे आरोपी राजस्थानचे आहेत. सलाउद्दीन अब्दुल हफिज, अजीजन सलाउद्दीन अब्दुल हफिज व सायरा बानो शरीफ अशी आरोपीची नावे आहेत. या टोळीने घराजवळ येताच आपल्याकडे अतींशक्ती असल्याचा दावा केला होता. ही शक्ती आम्ही तपस्या करीत प्राप्त केल्याचे त्यांना सांगितले. पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी ८५ हजार रुपये मागितले. मात्र ५० हजार रुपयात सौदा झाला. आरोपी महिलेकडे तीन वेगवेगळे आधारकार्ड सापडले आहे. शहर पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंकज वंजारे म्हणाले की अवैद्यकीय पद्धतीने कुठलेच आजार बरे होत नाही. या टोळीने हातचलाखी करीत अनेकांची विविध गावात फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. सखोल चौकशी करावी अशी मागणी जादूटोणा विरोधी कायद्याचे मार्गदर्शक असलेले वंजारे करतात. रोग दुरुस्त करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूना त्वरित अटक केल्याबद्दल त्यांनी वर्धा शहर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Story img Loader