अकोला : ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मीळ आजाराने ग्रस्त रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ होताच खासगी रुग्णालयाने रुग्णाला शासकीय रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी उपचार सुरू असतांनाच ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यात जीबीएसमुळे आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ ही एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार स्थिती आहे.  ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात. अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी, लकवा, अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास, कमजोरी, अशक्तपणा, हातपायांना मुंग्या येणे, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे, डायरिया आदी आजाराची लक्षणे आहेत. जीबीएस असलेले बहुतेक रुग्ण उपचारातून बरे होतात. याच्या उपचाराला मोठा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, शहरातील जीबीएस आजाराची लागण झाल्यानंतर ६३ वर्षीय रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवस खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यावर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णास जीबीएस सोबतच थॉयराइड आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. जीबीएस संक्रमणामुळे अकोला जिल्ह्यात आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता सर्वोपचार रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. जीबीएसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यात आता जीबीएस आजाराची दोन रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजाराच्या रुग्णांवर महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उपचार करावा लागतो. या दोन रुग्णांवरही उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सर्वोच्च रुग्णालयातील प्रशासनाकडून सांगण्यात आले. जीबीएसची लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात तपासणी करून उपचार घ्यावे, असे सांगितले.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, त्यासाठी पाणी उकळून प्यावे. अन्न स्वच्छ आणि ताजे असावे, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा, असे म्हटले आहे.