नागपूर : ‘क्राईम पेट्रोल’ मालिका बघून दोन मुलींनी घरातून पलायन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीला जाऊन वैमानिक होण्याचा निर्धार केला. मात्र, पळून जाण्यापूर्वी त्यांना रेल्वेस्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने भविष्यात होणारा मोठा अनर्थ टळला. दोन्ही मुलींचे समूपदेशन करण्यात आले.
रिया आणि टिना (काल्पनिक नाव) या १४ वर्षांच्या मैत्रीणी सक्करदरा परिसरात राहतात. रियाचे वडील अभियंता तर आजोबा शासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. रियाचे वडील नेहमी ‘क्राईम पॅट्रोल’ नावाची मालिका पाहतात. वडिलांमुळे रियालाही मालिका बघायची सवय लागली. मालिकेच्या एका भागात एक मुलगी घरातून पळून जाते आणि ती भविष्यात मोठी वैमानिक होते, असे दाखविण्यात आले होते. या मालिकेचा रियाच्या डोक्यावर मोठा परिणाम झाला. तिने दिल्लीला जाऊन वैमानिक होण्याचे स्वप्न बघितले. मैत्रिण टिना हिला कल्पना दिली. टिनाचे वडील वाहनावर चालक तर आई सतत आजारी राहते.
हेही वाचा : बिबट्यांच्या लढाईत वाघाची “एन्ट्री” अन्……
दोघींनीही घरातून पळून दिल्लीला जाण्याचे ठरविले. थेट रेल्वेस्थानक गाठले.दोन्ही मुली अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी लगेच सक्करदरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. ठाणेदार धनंजय पाटील यांनी शोधाशोध सुरू केली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही मुलींना रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेतले.