गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवून घेतले. इतकेच नव्हे तर सहपालकमंत्री म्हणून राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना जबाबदारी दिली. परंतु गडचिरोलीतील खासगी कंपन्याना वगळता सर्वसामान्यांचे प्रश्न ‘जैसे थे’ असल्याने हे दोन पालकमंत्री काय कामाचे, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि आमदार रामदार मसराम यांनी उपस्थित केला. २२ एप्रिलला विविध मागण्यांसाठी देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन केले जाईल, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

जिल्ह्यात हातातोंडाशी आलेला मका व धान पीक खंडित वीजपुरवठ्यामुळे वाळत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने चक्काजाम आंदोलनाची तयारी केली आहे. शेतकऱ्यांसह इतर प्रश्नांबाबत भूमिका विषद करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषद घेतली. आमदार मसराम, जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष सतीश विधाते यावेळी उपस्थित होते.

आमदार मसराम म्हणाले, कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा करावा, रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा, वनपट्टे नियमित करावेत, आदी मागण्यांबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केले. मात्र, सत्ताधारी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्रीच पालकमंत्री आहेत. शिवाय, सहपालकमंत्रीही नेमले आहेत. मात्र, सामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत. ब्राह्मणवाडे यांनी पालकमंत्री गडचिरोलीत केवळ लोहखनिज प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांच्या कार्यक्रमासाठी येतात. परंतु त्यांच्याकडे येथील गरीब आदिवासी, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी टीका केली.

मागण्या काय?

वीजपुरवठा सुरळीत करावा, रानटी हत्तींचा उपद्रव रोखावा, विमानतळासाठी सुपीक जमीन अधिग्रहित करू नये, धान खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, वनपट्टे नियमित करावेत, मनरेगांतर्गत प्रलंबित मजुरी द्यावी, महामार्ग, राज्य मार्गांची कामे पावसाळ्यापूर्वी करावीत, रिक्त पदे भरून जनतेची कामे विनाविलंब पूर्ण करावीत आदी मागण्यांसाठी २२ एप्रिल रोजी देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.