वर्धा : अद्यावत रूग्ण परीक्षणासाठी मेघे विद्यापिठाने थेट अमेरिकेतील दोन आरोग्य संस्थांशी करार करत वैद्यकीय सेवेत नवे पाऊल टाकले आहे.
न्यूयॉर्क येथील वाइल कॉनेल मेडिसीन तसेच रॉचेस्टर येथील मेयो क्लिनीक या दोन अमेरीकन संस्थांशी मेघे विद्यापिठाचा सहकार्य करार झाला आहे. ‘अनुकृती’ म्हणून हे अद्यावत प्रायोगिक शिक्षण केंद्र नुकतेच कार्यान्वीत झाले आहे. वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी रूग्ण परीक्षण व निदान कौशल्यात पारंगत होत अधिक दर्जेदार रूग्णसेवा देतील, असा या केंद्राचा हेतू आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त केंद्राचे उद्घाटन विद्यापिठाचे प्रकुलपती डॉ.वेदप्रकाश मिश्रा व प्रधान सल्लागार सागर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले.
मेयो क्लिनीक पुरस्कृत प्रशिक्षणात डॉ.ऐश्वर्या उईके, डॉ.राजेश गट्टाणी, डॉ.मंजूषा अग्रवाल व डॉ.प्रफुल्ल वासनिक हे तज्ञ मार्गदर्शन देतील. तर वाईल कॉनेल मेडीसीनच्या केंद्राचे प्रमुख डॉ.राजेश ज्ञानचंदानी व उपसंचालक डॉ.श्रध्दा पटेल यांच्या मार्गदर्शनात प्रायोगिक पद्धतीने प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. डॉ.शौर्या आचार्य, डॉ.सुनीलकुमार यांचे विशेष मार्गदर्शन राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.ललित वाघमारे यांनी दिली. प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, ईच्छुक रूग्ण यांच्या सहभागासह प्रशिक्षण चालेल. उद्घाटनप्रसंगी प्रकुलगुरू डॉ.गौरव मिश्रा, प्रशासकीय महासंचालक डॉ.राजीव बोरले, समन्वयक डॉ.एस.एस.पटेल, डॉ.संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ.उदय मेघे, कुलसचिव डॉ.श्वेता काळे, अधिष्ठाता डॉ.अभय गायधने प्रामुख्याने उपस्थित होते.