नागपूर : नागपुरातील महापुराचा अनेकांना फटका बसला, झोपड्यांमध्ये पाणी शिरले, बहुमजली इमारतींनाही फटका बसला, व्यापारीही यातून सुटले नाहीत. नागपूरची प्रमुख बाजारपेठ असलेल्या बर्डीतील व्यापाऱ्यांचे या पुराने तर कंबरडेच मोडले, त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणारे व्यावसायिक यांना जबर फटका बसला. काय घडले नेमके.
धंतोलीत यशवंत स्टेडियमपुढे ‘लॅपटॉप’सह इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीची अनेक दुकाने आहेत. यापैकी अनेक तळमजल्यात असल्याने या दुकानांमध्ये पाणी शिरले. याच भागात ‘सिल्वर सिस्टीम’ हे ‘लॅपटॉप’चे दुकान आहे. तेथील दोनशेवर ‘लॅपटॉप’ निकामी झाले. अशाच प्रकारे इतर पाच ते दहा दुकानांची स्थिती आहे.
‘सिल्वर सिस्टीम’चे मालक सोनी केवलरामानी म्हणाले, पंचशील चौकातील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी सर्वत्र पसरले. ते दुकानातही शिरले, माझ्या दुकानातील सुमारे दोनशे ‘लॅपटॉप’ निकामी झाले असून सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बर्डीतील तळमजल्यावरील कापडांच्या दुकानांनाही फटका बसला. सेंट्रल मॉल, बिग बाजारच्या तळघरात पाणी काढणे रविवारपर्यंत सुरू होते. तेथे ठेवण्यात आलेला सर्व माल खराब झाला होता.