बुलढाणा : सर्वेक्षण आणि तपासणीसाठी येणाऱ्या वैद्यकीय पथकांच्या भेटीचा धडाका कायम असताना रुग्ण संख्येतील वाढही कायम असल्याचे दुर्दैवी चित्र शेगावात आहे. आजअखेर शेगाव तालुक्यात केसगळती रुग्णांची संख्या १९० वर गेली आहे. नांदुरा तालुक्यातील रुग्णसंख्या सातवर स्थिर असली तरी एकूण रुग्णसंख्या दोनशेच्या घरात म्हणजे १९७ पर्यंत पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

८ जानेवारीच्या आसपास या अनामिक व तितक्याच विचित्र आजाराचे रुग्ण प्रकाशात आले. यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणमध्ये तीन ते चार गावांत ६१ रुग्ण आढळून आले. प्रारंभी हा आजार एका प्राथमिक आरोग्य केंद्रापुरता आणि तीनचार गावांपूरता मर्यादित होता. मात्र, आठवड्यातच या आजाराने चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बारा गावांपर्यंत हात पाय पसरले. आठ जानेवारीला ६१ रुग्ण आढळल्यावर दुसऱ्या दिवशी ३५, १० जानेवारीला २७, नंतर १२, ८, ६, २२, १० आणि आज १६ जानेवारीला आणखी ९ रुग्ण आढळले आहेत. आजअखेर शेगाव तालुक्यातील ११ गावांतील रुग्णसंख्या १९० पर्यंत पोहोचली आहे. नांदुरा तालुक्यातील वाडी या गावातील संख्या सातवर स्थिर असून दोन्ही तालुक्यांतील रुग्णसंख्या एकूण १९७ पर्यंत पोहोचली आहे.

आणखी वाचा-नागपुरात मानसोपचार तज्ज्ञांकडून महिलांवर अत्याचार प्रकरण…आता थेट उपसभापतींनीच…

पावणे पाच हजार घरांचे सर्वेक्षण

पहुरजीरा गावात सर्वाधिक ३५ रुग्ण असून त्याखालोखाल कठोरा २८, कालवड २४, बोण्डगाव २३, माटरगाव बुद्रुक २३, तरोडा खुर्द १३, मच्छीन्द्रखेड ११, निंबी १०, भोनगाव १०, अशी दुहेरी रुग्णसंख्या असलेल्या गावांची नावे आहेत. हिंगणा ५ आणि घुई ८ या गावांतील रुग्ण कमी आहेत. कमीअधिक २५ हजार लोकसंख्येच्या बारा गावांतील ४ हजार ६५५ घरांच्या सर्वेक्षणात हे रुग्ण आढळून आले आहेत.

आणखी वाचा-धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…

‘आयसीएमआर’चे पथक मुक्कामी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशावरून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)च्या शास्त्रज्ञांचे दिल्ली आणि चेन्नई येथील पथक शेगावत तळ ठोकून आहे. तपासणी, सर्वेक्षण आणि रुग्णांच्या गाठीभेटी, नमुने संकलन, यांद्वारे या आव्हानात्मक आजाराचे निदान, मूळ शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा आजार कशामुळे झाला, त्याचे मुळ शोधून प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ते काम करीत आहेत. विशेष पथकामध्ये डॉ. मनोज मुऱ्हेकर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नई), डॉ. सोमेश गुप्ता (एम्स, नवी दिल्ली), डॉ. सुमित अग्रवाल (नवी दिल्ली), डॉ. शीला गोडबोले (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे), डॉ. राज तिवारी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ, भोपाळ), डॉ. सुचित कांबळे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) यांचा समावेश आहे. आजाराचे निदान होईपर्यंत शेगाव न सोडण्याचा निर्धार या पथकाने बोलून दाखवला. हा निर्धार पूर्ण होतो का? आणि कधी पूर्ण होतो, याकडे शेगाव तालुकाच नव्हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागून आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two hundred patients of hair loss problem icmr team in shegaon scm 61 mrj