अकोला : विहीर खोदण्यासाठी अनुदान मिळते, तसेच बँकांकडून कर्ज घेता येते. विहीर खोदण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. विहीर खोदण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सरासरी तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो.विहीर खोदण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच मनुष्यबळाची देखील गरज असते. साधारणत: उन्हाळा सुरू होण्यापूर्वी विहिरी खोदण्याच्या कामाला प्रारंभ केला जातो. सध्या अनेक भागात विहिरींचे खोदकाम सुरू आहे. वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे विहिरीचे खोदकाम सुरू असतांना मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक त्याच्या बाजू खचल्या. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला. रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे ही घटना घडली. गावालगत शेत शिवारात रमेश रामचंद्र धांडे यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू होते. यामध्ये प्रल्हाद उकंडी देवकर (वय ४७ वर्षे, रा. एकलासपूर ता. रिसोड, जि. वाशीम) व प्रकाश रावसाहेब देशमुख (वय ४५ वर्षे, रा. मोठेगाव ता. रिसोड, जि. वाशीम) हे दोघेही विहिरीमध्ये ‘ड्रिलिंग’चे काम करत होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली.

या दरम्यान अचानक विहिरीच्या बाजू खचल्या. यामध्ये दोन्हीही मजूर दबले व त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. जेसीबीच्या मदतीने माती सरकवून दोन्ही मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती कळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे. विहीर खोदण्याच्या कामात दोन मजुरांचा जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विहीर खोदण्याचे काम हे अत्यंत कठीण स्वरूपाचे असते. त्यामुळे विहिरीचे खोदकाम करतांना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक एक भाग कोसळून त्याखाली दोन मजूर दबले. या दुर्घटनेत दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यात मोठेगाव येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.