नागपूर : नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात “एव्हीयन इन्फ्लुएन्झा” (एच५एन१) या विषाणूची लागण होऊन तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यूची घटना ताजी असतानाच आता चंद्रपूर येथील “ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात असलेल्या दोन बिबट्यांना “एव्हीयन इन्फ्लुएन्झा” (एच५एन१) या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पक्षीच नाही तर प्राण्यांनादेखील या विषाणूचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रातून एक वाघ गोरेवाडा बचाव केंद्रात पाठवण्यात आल्याने गोरेवाडा प्रशासन त्याला कसे हाताळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोरेवड्यात काय झाले ?

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ११ डिसेंबर २०२४ ला दोन वाघ तर १६ डिसेंबरला एक वाघ गोरेवाड्यातील बचाव केंद्रात स्थलांतरित करण्यात आला. या तिनही वाघांचे पिंजरे एकमेकांना लागून होते. बिबट हा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात होता. वाघांना स्थलांतरित केल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांच्यात ‘एव्हीयन इन्फ्लुएंझा’ची लक्षणे देखील नव्हती. मात्र थोडेफार लंगडत होते. जेवण कमी घेत होते. त्याचवेळी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्या नकारात्मक आल्या. मात्र, यातील दोन वाघांचा व एका बिबट्याचा २० डिसेंबरला तर एका वाघाचा २३ डिसेंबरला मृत्यू झाला. त्यामुळे गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात तपासणी करण्यात आली. त्यात ‘एव्हीयन इन्फ्लुएंझा’मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तरीही हे या प्राण्यांचे नमुने भोपाळ येथील ‘आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसिज’येथे पाठविण्यात आले. २ जानेवारी २०२५ ला अहवाल आला. त्यातदेखील ‘एव्हीयन इन्फ्लुएंझा’मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा…आयुध निर्माण कंपनी स्फोट; मृतांची संख्या १३ ? आकडा वाढण्याची शक्यता

चंद्रपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात काय झाले?

चंद्रपूर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील दोन बिबट्यांची “एव्हीयन इन्फ्लुएन्झा” (एच५एन१) या विषाणूची चाचणी सकारात्मक आली आहे. भोपाळ येथील ‘आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसिज’येथे नमुने पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून भोपाळच्या प्रयोगशाळेने हा अहवाल सकारात्मक दिला आहे. यासोबतच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये जटायू प्रकल्पांतर्गत सोडण्यात आलेल्या तीन पांढऱ्या रंगाच्या गिधाडांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला होता. या गिधाडांना फक्त एकदाच औषधीयुक्त चिकन दिले गेले असल्याने हा विषाणू जंगली स्त्रोतांमधून पसरण्याची शक्यता तज्ज्ञांची व्यक्त केली आहे.

अलर्ट काय?

गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने राज्यातील प्राणीसंग्रहालय आणि बचाव केंद्रात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्राणीसंग्रहालय, बचाव आणि संक्रमण उपचार केंद्रांना (टीटीसी) सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोरेवाडा बचाव केंद्रात सध्या १२ वाघ आणि २४ बिबट आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात देखील तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा…पुण्यानंतर आता नागपुरातही ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण… मेडिकल रुग्णालयात…

खबरदारीच्या सूचना काय?

जैवसुरक्षा, निर्जंतुकीकरणाच्या सूचना राज्यातील प्राणीसंग्रहालयांमध्ये जैवसुरक्षा आणि निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले आहे. सोबतच प्राण्यांचे नमुने गोळा करून भोपाळच्या केंद्रात पाठवण्यास सांगितले आहे. प्राणीसंग्रहालयांतील सर्व कर्मचाऱ्यांना योग्य वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई), हातमोजे, मास्कसह सुसज्ज करण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, योग्य स्वच्छता पद्धती यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two leopards at transit treatment center found to be infected with avian influenza h5n1 virus rgc 76 sud 02