नागपूर : संपत्तीसाठी फक्त माणसंच भांडतात असे नाही, तर वन्यप्राणी देखील तेवढेच भांडतात. जंगलातील अधिवासातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी वाघ आणि बिबट यांच्यात लढाया होताना आपण नेहमीच पाहतो आणि ऐकतो. मात्र, नवेगाव-नागझिरा अभयारण्यात एक वेगळाच प्रसंग पर्यटकांनी अनुभवला. दोन बिबट्यांच्या लढाईत वाघाने “एन्ट्री” घेतली आणि दोन्ही बिबट दोन दिशेला पसार झाले. त्यातल्या एकाने थेट झाड गाठले. तर वाघालाही कळले नाही नेमके काय झाले आणि तोही झाडावर चढायला लागला. हा प्रसंग या व्याघ्रप्रकल्पाचे पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी टिपला.

हेही वाचा : करोनामुळे पालक गमावलेल्यांचा शैक्षणिक खर्च शासन करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील नागझिऱ्याच्या चितळ मैदानात दोन बिबट्यांची अधिवसावरून जोरदार लढाई सुरू होती. साधारणपणे वाघ अधिवसावरून लढताना दिसून येतात, पण बिबट्यांच्या बाबतीत हे फार कमी पाहायला मिळते. पर्यटकांचे वाहन चितळ मैदानावर पोहचतात हे दृश्य पाहून ती थांबली आणि थोड्याच वेळात तिथे वाघोबा अवतरले. वाघ आणि बिबट एकमेकांजवळ सहसा रहात नाही. वाघोबांचे आगमन होताच बिबट्याने धूम ठोकली. त्यातला एक भराभरा झाडावर चढला. बिबट्यांच्या अनपेक्षित वागण्याने वाघोबा चक्रावले आणि त्यानेही झाडाचा आसरा घेत त्यावर चढण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपूजनाच्या पूर्व संध्येला पर्यटकांनी हा प्रसंग अनुभवला आणि त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली.