बुलढाणा : महिलांवरील अत्याचारच्या घटना सतत वाढत असतानाच आता सुसंस्कृत महाराष्ट्रात बालकसुद्धा सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक नगरी असलेल्या खामगाव शहरात एका अल्पवयीन बालकावर दोन नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे खामगाव शहर अक्षरशः हादरले आहे.
खामगावात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. एका १४ वर्षीय मुलावर दोघा नराधमांनी बळजबरी लैंगिक अत्याचार केला. खामगाव नांदुरा रोडवरील जिल्हा परिषद शाळेत हा चीड आणणारा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी दोघा नराधमांविरुद्ध खामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, पारंपरिक स्वागत, पोलीस मानवंदना बंद
खामगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगा १४ वर्षांचा असून ४० टक्के अंध आहे. त्याच्या असहायतेचा फायदा नराधमांनी घेतला. स्वप्निल दिलीप गवारगुरु (२९, रा. धोबी खदान, खामगाव) आणि आशीष अरुण शिंदे (३६, रा. हरी फैल, आंबेडकर नगर) अशी नराधम आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार दोन्ही आरोपी पिडीत मुलाच्या मागावर होते. दोघांनी पिडीत मुलाला जिल्हा परिषदेत शाळेत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेनंतर पिडीत बालकाला वेदना होऊ लागल्याने त्याने घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर खामगांव पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.