चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आईपासून दुरावलेल्या अवघ्या दोन महिन्याच्या (मादी) बछड्याची अवघ्या काही तासांमध्ये वाघिणीशी भेट घालून देण्यात आली. बिछडलेल्या पिल्लाला भेटून मादीने सुटकेचा श्वास सोडला.ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पात रविवार ३० मार्च रोजी सर्वत्र मराठी नववर्षाचे आणि गुढी पाडवा आनंदात साजरा करण्यात येत होता. अशातच ताडोबा प्रकल्पात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एक दोन महिन्यांचा मादी बछडा आईपासून दुरावला. जंगलात फिरतांना आई एकीकडे निघून गेली आणि बछडा पळसगांव क्षेत्रातील विहीरगांव येथे एका शेतात मिळाला.

वाघाच्या बछड्याला बघून गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.प्रभुनाथ शुल्का, ताडोबा बफर झोनचे उपसंचालक लेफ्टनंट कुशाग्र पाठक यांच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतातून वाघिणीच्या पिल्लाला सुखरूप बचाव करून आणण्यात आले. त्यानंतर पिल्लाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बछडा सुदृढ दिसून आला आणि अवघ्या काही तासांपूर्वीच आईपासून दुरावला असल्याने वाघिण जवळच कुठे तरी जंगलात भटकत असावी असा अंदाज वन विभागाला आला. त्यानंतर वन विभागाने वाघिणीचा शोध घेतला. वाघिणीचा शोध लागल्यानंतर बछड्याला दुपारी एक वाजताच्या सुमारास वाघिणीजवळ सोडून देण्यात आलेे. वन विभागाच्या पथकानेच आई व बछड्याची अवघ्या चार तासात भेट करून दिली.

ताडोबा प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी आतापर्यंत ८३ वाघ, बिबटे, तथा बछड्यांना अशा प्रकारे जेरबंद केले आणि त्यानंतर जंगलात सोडून दिले आहे. डॉ.खोब्रागडे यांच्या या ज्ञानाचा फायदा ताडोबा प्रकल्पाला सातत्याने होत आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.खोब्रागडे यांचे वाघ, बिबट तसेच अन्य वन्यप्राण्यांप्रती असलेले प्रेम, आपुलकी बघता वन विभागाने त्यांची कायम सेवा घ्यावी अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मानव – वन्यजीव संघर्षात डॉ.रविकांत खोब्रागडे सातत्याने धावून आले आहेत. आताही त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे वाघिण आणि बछड्याची भेट झाली. आजही ताडोबातील गावात वाघ आला तर पहिले डॉ. खोब्रागडे यांनाच पाचारण केले जाते. डॉ.खोब्रागडे देखील आपुलकीने सेवा देत असल्याने वन विभागाने सकारात्मक विचार करावा असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.