नागपूर: उपराजधानीत पुन्हा एकदा खूनसत्र सुरु झाले असून गेल्या चोवीस तासांत दोन हत्याकांडांनी शहर हादरले आहे. सध्या सण-उत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाच हत्याकांड घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या हत्याकांडात तीन आरोपींनी दुकानात घुसून व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार केले तर सक्करदऱ्यातील दुसऱ्या हत्याकांडात चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा लोखंडी पाईपने हल्ला करून खून केला. दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत, ’प्राॅपर्टी’च्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालक जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा यांचा गोळी झाडून खून करण्यात आला. ही थरारक घटना बुधवारी पहाटे तीन वाजतच्या सुमारास मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊसमध्ये घडली. मोहम्मद परवेज सोहेल मोहम्मद हारून (२४) रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा, सलमान खान समशेर खान पठाण (२७) हसनबाग, आणि आशिष सोहनलाल बिसेन (१८) खरबी चौक अशी आरोपींची नावे आहे.
हेही वाचा… नागपूर: धक्कादायक! प्रेयसीसाठी पत्नीचा खून
जमील अहमद यांचे रहमान चौक, मोमीनपुऱ्यात तीन मजली इमारतीत घर आणि अल करीम या नावाने गेस्ट हाऊस आहे. यासोबतच प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसायही करीत होते. याच व्यवसायातून कुख्यात गुंड आबू खान याचा भाचा मो. परवेज याच्यासोबत ओळख झाली. मागील सहा वर्षांपासून ते मिळून संपत्ती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. गेल्या काही दिवसांपासून जमील आणि आरोपी परवेज यांच्या ‘प्राॅपर्टी’ खरेदी-विक्रीवरून वाद होता. त्यांच्यात खटकेही उडाले. घटनेच्या वेळी जमील आणि त्याचा कर्मचारी अब्दुल माजीद हे दोघेही गेस्ट हाऊसच्या काऊंटवर बसले होते. आरोपी परवेज, आशिष आणि सलमान हे गेस्ट हाऊसमध्ये आले. त्यांनी जमीलशी वाद घातला आणि थेट पिस्तूल काढून जमील यांच्या डोक्यात गोळी झाडली. जमील रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळताच आरोपींनी पळ काढला. माहिती मिळताच तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळ गाठले. आरोपी परवेज हा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.
हेही वाचा… नागपूर: चिडलेल्या सासूचा जावयावर चाकूने हल्ला
दुसऱ्या घटनेत, पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण लागल्याने पती श्यामकिशोर तेजलाल गजाम (२७) याने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता शितला माता चौक परिसरात घडली. अनुसया ऊर्फ दिव्या गजाम (२४) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिव्या आणि श्याम यांचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर दिव्या ही कुण्यातरी नातेवाईकाशी वारंवार संपर्कात होती. श्यामने तिला त्या युवकाशी न बोलण्याची तंबी दिली होती. गेल्या १० दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात श्याम हा पत्नीला घेऊन नागपुरात आला. ईपीएफ कार्यालयाच्या शासकीय निवासस्थानात तो पत्नीसह राहत होता. पत्नी फोनवरून कुणाशीतरी बोलत असल्यामुळे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. मंगळवारी रात्री श्यामने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने वाद झाला. श्यामने लोखंडी पाईपने पत्नीच्या डोक्यावर हल्ला केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर तो घरातून पळून गेला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सक्करदरा पोलिसांनी श्यामकिशोरवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.