लोकसत्ता टीम
चंद्रपूर: एकापाठोपाठ दोन हत्यांनी चंद्रपूर जिल्हा हादरला. चिमूर तालुक्यातील आंबोली येथे ४५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली तर चंद्रपुरातील रामसेतू पुलावर डिजेवर नाचताना झालेल्या वादात किशोर नत्थुजी पिंपळकर (४८) रा. तिरवंजा याची हत्या करण्यात आली.
बाबूपेठ येथील संदिप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताळा मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन सभागृहात शनिवार १५ जून रोजी होता. वरातीत डिजेच्या तालावर नाचताना ओम पिंपळकर या युवकाशी काही अज्ञात मुलांचा वाद झाला. लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपूलावर अडवून मारहाण करणे सुरू केली. घटनेची माहिती ओमचे वडील किशोर पिंपळकर यांना होताच ते भांडण सोडवायला गेले.
हेही वाचा… यवतमाळ: हृदयद्रावक! नवजात बालिकेला बिब्याचे चटके; सतत रडते म्हणून अघोरी उपाय, प्रकृती चिंताजनक
अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. यात किशोर पिंपळकर खाली कोसळले. दरम्यान, मारेकऱ्यांनी पळ काढला. जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा… वर्धा: सेवाग्रामच्या डॉक्टरची आत्महत्या; रिधोरा धरणात मृतदेह आढळला
चिमूर येथून जवळच असलेल्या आंबोली येथील एका इसमाने ४५ वर्ष महिलेचा खून करून मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शारदा दयाराम वाघ असे मृत महिलेचे नाव आहे तर मोहन दयाराम वाघ (२८) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. आंबोली येथील आबादी प्लॉट बस स्थानक परिसरात राहत असलेल्या शारदा वाघ आणि त्यांचा मुलगा मोहन हे दोघेही आपल्या घरी झोपडी उभारण्यासाठी खड्डे खोदत असताना शेजारी गोपीचंद सम्पत शिवरकर यांनी त्यांच्यासोबत भांडण केले. वाद विकोपाला गेल्याने शारदा वाघ यांच्या डोक्यावर बैलबंडीच्या उभारीने वार केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी मुलाने धाव घेतली असता, तोही जखमी झाला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.