नागपूर : उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडली असून पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याचे चित्र शहरात आहेत. गेल्या चोवीस तासांत एमआयडीसी आणि अजनी परीसरात दोन हत्याकांड उघडकीस आले. पहिल्या हत्याकांडात चक्क पोलिसांच्या खबऱ्याचा काही गुंडांनी खून केला तर दुसऱ्या घटनेत युवकाचा खून करून मृतदेह कचऱ्यात फेकल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.
पहिल्या घटनेत, राकेश चंद्रकांत मिश्रा (३२, राजीवनगर) हा पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करीत होता. त्याचे पोलिसांसोबत नेहमी संपर्क येत होता. एमआयडीसीतील कुख्यात गुंड अर्जून ऊर्फ पिस्सा रामा दांडेकर आणि त्याच्या भाऊ बर्रा यांचे अवैध धंदे सुरु होते. त्यांच्या धंद्यावर पोलीस वारंवार कारवाई करीत होते. त्यामुळे दांडेकर भावंडांना राकेशवर संशय होता.
हेही वाचा – तलाठी भरती पेपरफुटी : पोलीस भरतीतील फरार आरोपीने फोडला पेपर!
राकेशच्या सांगण्यावरूनच पोलीस कारवाई करीत असल्याचा संशय असल्याने त्याचा काटा काढण्याची योजना आखण्यात आली. गुरुवारी रात्री दहा वाजता राकेश आणि त्याचा मित्र रवी जैसवाल हे राजीवनगरातील जैसवार पानठेल्यावर उभा असताना कारमधून बर्रा आणि पिसा यांच्यासह ५ ते ६ जण तेथे आले. त्यांनी राकेश आणि रवी यांच्यावर अचानक हल्ला केला. रवी पळून जाण्यात यशस्वी झाला तर राकेश तावडीत सापडला. आरोपींनी चाकूने भोसकून राकेशचा खून केला आणि पळून गेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत, राजश्रीनगरातील मोकळ्या मैदानावर एका ३५ ते ४० वर्षांच्या युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. मैदानावर फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला मृतदेह दिसला. त्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दुरध्वनी करून माहिती दिली. माहितीवरून अजनीचे ठाणेदार नितीन फटांगरे हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले.
हेही वाचा – पतीचे दुसरीवर जडले प्रेम, घटस्फोटासाठी पत्नीचा छळ; विवाहितेने गाठले…
मृतदेह किमान ८ ते १० दिवसांपूर्वी फेकलेला असावा, असा अंदाज आहे. मृतदेहावर शस्त्राच्या खुणा नसून कुणीतरी गळा आवळून खून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अजनी पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. खुनाबाबत तपासात निष्पन्न झाल्यास हत्यकांडाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अजनी पोलिसांचे म्हणने आहे.