गडचिरोली : धानोरा तालुक्यातील बोधीटोलाजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. यात जांभूळखेडा भूसुरुंगस्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील गोडलवाही या शेवटच्या चौकीपासून १० किलोमीटर अंतरावर बोधीटोलाजवळील सीमेवर नक्षल्यांची एक मोठी तुकडी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही टोळी पोलीस जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत होती. याची कुणकुण लागताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. दरम्यान, पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. एक तास चाललेल्या या धुमश्चक्रीनंतर नक्षली जंगलाच्या दिशेने पसार झाले. परिसरात पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेत दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्याकडे एके ४७ सारख्या घातक शस्त्रासह एसएलआर बंदूक आढळून आली. यातील एकाची ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : ओबीसींच्या १० पैकी ८ मागण्या मान्य, चिमूर येथे सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण मागे

हेही वाचा – इंडियन ऑईलमध्ये दीड हजाराहून अधिक पदांसाठी भरती; सविस्तर माहितीसाठी…

२०१९ मध्ये नक्षल्यांनी जांंभूळखेडा भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता. यात गडचिरोली पोलीस दलातील १५ जवान शहीद झाले होते. या स्फोटाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार होता. दुसऱ्या नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two naxalites killed in police naxal encounter in gadchiroli district mastermind of jambhulkheda blast among the dead