बुलढाणा: जगातील खडतर आणि आव्हानात्मक मानली जाणारी कझाकस्तानमधील आयर्नमॅन स्पर्धा जिल्ह्यातील दोन सुपुत्रांनी पूर्ण केली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकली आहे.
देऊळगाव माळी (ता.मेहकर) येथील प्रशांत राऊत व संदीप गाभने अशी या दोन आयर्न मॅन ची नावे आहे. २ जुलै रोजी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही कामगिरी पूर्ण करणारे ते जिल्हयातील पहिलेच धावपटू ठरले आहे. स्पर्धकांना ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग व ४२ किमी धावणे आवश्यक आहे. ही सर्व कसरत १६ तास ३० मिनिटांत पूर्ण करायची असते. यावरुन या स्पर्धेचे काठिण्य स्पष्ट होते. जग भरातील स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगतात.
हेही वाचा… नोकरभरतीतील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी ‘हे’ करा; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची काय आहे मागणी
या स्पर्धेत सकाळी कडाक्याच्या थंडीत पोहणे, त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यात तब्बल १८० किमी अंतर सायकलिंग करावी लागते. एवढे दिव्य पूर्ण करुन दुपारच्या प्रखर सूर्यकिरणांमध्ये ४२ किलोमीटर धावणे असे टप्पे असतात. यामुळे ही स्पर्धा खूप आव्हानात्मक झाली होती. मात्र, प्रशांत आणि संदीप यांनी हिंमत सोडली नाही. ते दोघेही बालमित्र असून ‘फार्मास्युटिकल मार्केटिंग’ क्षेत्रातही सोबतच कार्यरत आहेत. मागील २ वर्षांपासून ते सराव करीत होते. आठवड्याला १७ ते १८ तास सराव केला.