नागपूर : ‘त्या’ वाघिणीचा जंगलात मृत्यू झाला आणि तिचे शावक सैरभैर झाले. त्या अनाथांना सांभाळणार कोण, हा प्रश्न होताच, पण सांभाळले तरी त्यांना कायम बंदिवासातच राहावे लागणार, ही भीतीही होती. मात्र, वनखात्यातील अधिकाऱ्यांना त्यांना बंदिवासात ठेवायचे नव्हते आणि म्हणूनच त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठीचा प्रवास सुरू झाला आहे.
पांढरकवडा येथील ‘पीकेटी-७’ या मृत वाघिणीच्या दोन अनाथ शावकांना जंगलात पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पेंच व्याघ्रप्रकल्पात सुरुवात करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ‘पीकेटी-७’ या वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन्ही शावकांना पांढरकवडा येथून जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी गोरेवाडा बचाव केंद्रात करण्यात आली होती.
दरम्यान, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या सूचनेनुसार दोन्ही शावकांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी बुधवार, २९ मार्चला पेंच व्याघ्रप्रकल्पातील तित्रालमागी येथे तयार करण्यात आलेल्या खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या वाहनाने गोरेवाडा बचाव केंद्रातील डॉ. शालिनी व ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे डॉ. सुदर्शन काकडे यांच्या उपस्थितीत पेंचमध्ये स्थलांतरित करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने घालून दिलेल्या मानकांच्या आधारे या दोन्ही शावकांना तित्रालमांगी येथील खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले.
हेही वाचा – अकोला : आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन
यावेळी पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे उपस्थित होते. यासाठी पूर्व पेंच वनपरिक्षेत्राचे क्षेत्रीय कर्मचारी आणि जलद बचाव गटाचे सर्व वनरक्षक यांनी विशेष सहकार्य केले.