नागपूर : भरधाव ट्रकने ट्रिपल सीट जाणाऱ्यांना जबर धडक दिली. या अपघातात जावाई-सासऱ्यांचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. आकाश दुर्गाप्रसाद जांभुळकर (२६, परसोडी, लाखनी, भंडारा) व सासरे राजाराम नानाजी दुर्गे (५५ वर्षे, रा. सुपगाव,चंद्रपूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर आकाशची पत्नी निर्धरा जांभुळकर (२७) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – वाशीम : युवाशक्ती करीअर शिबीर केवळ फार्स; पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत
हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजता झाला. सोमवारी आकाश हा सासरे राजाराम व पत्नी निर्धरासह ट्रीपल सीट चंद्रपूरहून मौदाच्या दिशेने दुचाकीवरून येत होता. हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत महामार्गावर गब्बा ढाव्यासमोर भरधाव ट्रकने आकाशच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात आकाश, त्याची पत्नी निर्धरा आणि सासरा राजाराम हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती आकाश व राजाराम दुर्गे यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.