भंडारा: शेतात रोवणीसाठी आलेल्या मजुरांना जवळच्या विहिरीत एक कासव दिसला, कासव पकडण्याचा मोह न आवरल्याने तिघे मजूर विहिरीमध्ये उतरले. मात्र आत गुदमरल्यामुळे त्यांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्यातील पेंढरी गावालगतच्या मोगरा – शिवनी शेतशिवारात आज बुधवारी घडली. दयाराम सोनिराम भोंडे, वय ३६ आणि मंगेश जय गोपाल गोंधळे, वय २६ अशी मृत शेतमजुरांची नावे आहेत.
गढ पेंढरी गावातील विष्णू गायधने यांच्या शेतात रोवणीचे काम सुरू होते. यासाठी लगतच्या मेंढा भुगाव येथील मजूर कामावर होते. बुधवारी सकाळी शेताच्या बाजूला असलेल्या जुनाट विहिरीत कासव दिसल्याने हे शेतमजूर विहीरीत उतरल्याची माहिती आहे. मात्र आधी उतरलेला बेशद्ध झाल्याने दुसरा उतरला. या दोघांनाही पुन्हा वर येताच आले नाही. त्यांना वाचविण्यासाठी सुधीर मोरेश्वर हजारे हा शेतमजूरही विहीरीत उतरला. मात्र त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने तो कसाबसा वर आल्यामुळे बचावला.
हेही वाचा… पुण्यात अटक झालेल्या दहशवाद्यांचे गोंदिया कनेक्शन….
ग्रामस्थांच्या मते, हे मजूर पाणी काढण्यासाठी आत उतरले होते, तर काहींच्या मते कासव पकडण्यासाठी उतरले होते. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्ही प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले. दोनही शेतमजुरांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.