गडचिरोली: एटापल्ली- कसनसूर मार्गावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाहून दोन संशयितांनी काही अंतरावर दुचाकी उभी करून पळ काढला. पळताना जवळची चटई पाण्यात फेकली. पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन बंदुका आढळल्या. त्यामुळे पोलिसही हादरुन गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एटापल्लीचे उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रविराज कांबळे हे उपनिरीक्षक संतोष मोरे, सविता काळे व सहकाऱ्यांसमवेत १३ जुलै रोजी सकाळी कसनसूर मार्गावर नाकाबंदी करुन वाहनांची झडती घेत हाेते. यावेळी दुचाकीवरुन (एमएच ३३ डी- ५७४९) दोघे आले. पोलिसांना पाहून ते थबकले.

हेही वाचा… गोंदिया शहरातील ४२ वॉर्डात दूषित पाणीपुरवठा; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

दोघांनी दुचाकी तेथेच उभी केली. त्यांच्याजवळ असलेली चटई त्यांनी एका नाल्यात टाकली व तेथून धावत सुटले. पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जंगलातून पसार झाले. दरम्यान गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नक्षल ‘कनेक्शन’चा संशय?

पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन रायफल आढळल्या. या शस्त्रासह दुचाकी जप्त केली आहे. दोन्ही संशयित आरोपी नेमके कोण, रायफल जवळ बाळगण्याचा उद्देश काय, ते शिकारीवर निघाले होतेे की नक्षल्यांशी संबंधित होते, त्यांचा काही कट होता का, या बाबी अद्याप गुलदस्त्यात आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people escape after leaving guns with two wheeler during nakabandi on etapalli kasansur route in gadchiroli ssp 89 dvr