जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणी काँग्रेस पक्षाशी संबंधित राजवीर यादव (३६) व अमर यादव (२९) या दोन जणांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वेकोलित नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेतले प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी दिली.
हेही वाचा >>> नागपूर: कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाला गडकरी पाठोपाठ काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचाही विरोध
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर ११ मे रोजी रात्री ९.३० वाजता मूल मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयातून स्कुटीने घरी जात असताना गोळीबार झाला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी नऊ पथक गठित केले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला होता. नायक यांच्याकडे तपास जाताच ४८ तासात आरोपींना पकडण्यात यश आले. दरम्यान, पोलिसांनी १५ दिवसानंतर गोळीबारप्रकरणी राजवीर यादव व अमर यादव या दोन आरोपींना चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातून सोमवारी रात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले आरोपी हे दोन्ही भाऊ असून ते दोघेही काँग्रेस समर्थित असल्याने राजकीय तर्क-वितर्कांना वेग आला आहे. मागील काही वर्षात जिल्ह्यातील राजकीय गुंडगिरीला उधाण आले असून अवैध व्यवसायात असणाऱ्या सर्व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. रावत यांच्यावरील गोळीबारामागे राजकीय शक्ती असल्याचे बोलले जात आहे. या आरोपींना दुर्गापूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. संतोष रावत यांनी बँकेतील नोकर भरतीसाठी पैसे घेतले. मात्र, नोकरी दिली नाही. त्यामुळे हा हल्ला केल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, बँकेचे संचालक यांच्यासह अध्यक्षांच्या वाहनचालकांची पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र, या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक परदेशी यांच्यावर आहे.
‘नार्को टेस्ट’ करून मुख्य सूत्रधाराला अटक करा – वडेट्टीवार
गोळीबार केलेल्या आरोपीची ‘नार्को टेस्ट’ करावी व या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराला अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले असून या गोळीबार प्रकरणामागे मोठा राजकीय नेत्यांचा हात असल्याचा दाट संशय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्याने प्रकरणाला गंभीर व राजकीय वळण लागले आहे.
राजकीय दृष्टिकोनातूनही तपास होणार वेकोलिमध्ये नोकरी लावून देण्यासाठी रावत यांनी ६ लाख रुपये घेतले होते. नोकरीही लावून दिली नाही आणि पैसे दिले नसल्यामुळे आरोपींनी रावत यांना ठार मारण्यासाठी गोळीबार केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी पत्रपरिषदेत सांगितले. एक आरोपी हा काँग्रेस पक्षाच्या उत्तर भारतीय सेलचा प्रमुख असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिली. राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या प्रकरणाचा तपास सुरू आहे असेही परदेसी यावेळी म्हणाले.