बुलढाणा : कोळी समाजाला महादेव कोळीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज, मंगळवारी दोन कार्यकर्ते येथील ‘बीएसएनएल’च्या टॉवरवर चढले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
आरक्षणाच्या मागणीसाठी शासन व प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन व विविध आंदोलने केली. मात्र, शासन व प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. भारतीय दूरसंचार निगमच्या मनोऱ्यावर पलढग (ता. बुलढाणा) येथील गंगाधर तायडे व बोथा फॉरेस्ट येथील निलेश गवळी हे चढले. त्यांची समजूत घालण्यासाठी ‘बीएसएनएल’चे दोन कर्मचारीसुद्धा टॉवरवर चढले. मात्र, त्यांनी कर्मचाऱ्यांना जुमानले नाही. बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे, बुलढाणा शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर व काही नेत्यांनी समजूत घातल्यावर अखेर ते खाली उतरले.
हेही वाचा – सोन्याच्या दरात मोठी घसरण.. नागरिकांना दिलासा..
यापूर्वी धनगर समाज आरक्षणसाठी मोताळा तालुक्यातील सोनाजी शांताराम पिसाळ याने टॉवर आंदोलन केले होते. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी याच टॉवरवर तो चढला होता. त्यानंतर टॉवरच्या असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे यांनी तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते व अशा घटना परत घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसे पत्रही बुलढाणा तहसीलच्या वतीने ‘बीएसएनएल’च्या शाखा प्रबंधकांना देण्यात आले होते. मात्र, काहीच कारवाई करण्यात आली नाही.