भंडारा: पाळीव कुत्र्यांनी आपल्या मालकावरच हल्ला केला. या पाळीव कुत्र्यांनी मालकाच्या शरीराचे लचके तोडले. या घटनेने भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे.
अनेकजण घरात पाळीव प्राणी ठेवतात. त्यात अनेकजण श्वान पाळण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र, या पाळीव कुत्र्यांकडून घरातील लोकांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळीव कुत्र्यांनी आपल्या मालकावरच हल्ला केला. या पाळीव कुत्र्यांनी मालकाच्या शरीराचे लचके तोडले. या घटनेने भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा… ६०० किलो वजनाचा ‘हल्ल्या’; किंमत…
पाळीव कुत्र्यांनीचं मालकाच्या शरीराचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार पांजरा गावात घडला आहे. ही घटना ३१ डिसेंबरची असून याचा व्हिडिओ आणि काही फोटो आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. विलास पडोळे असं कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाचं नावं आहे. पडोळे यांच्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत. नेहमी प्रमाणे ३१ डिसेंबरच्या दुपारी ते कुत्र्यांना घराबाहेर फिरायला घेवून गेले होते. यावेळी दोन्ही कुत्र्यांचे बेल्ट पडोळे यांनी स्वतःच्या हाताला बांधले होते.
हेही वाचा… चंद्रपूर: जलजीवन मिशनच्या कामात ७८ कंत्राटदारांना निविदेच्या २.५ टक्के दंड
दरम्यान, दोन्ही कुत्र्यांनी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे बेल्ट मालक पडोळे यांच्या हाताला बांधलेलं असल्यानं सुटका झाली नाही. आणि त्यातूनच चवताळलेल्या कुत्र्यांनी मालकावरच हल्ला चढवून शरीराचे लचके तोडले. ग्रामस्थांनी त्यांची कशीबशी सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांच्यावर आता पुढील उपचार नागपूर इथं करण्यात येत आहेत.
भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना होत असतात. मात्र, पाळीव श्वानांकडूनही हल्ले होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.