भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना निलंबित करण्यात आले. एका महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (सोमवार) नागपुरात प्रसारमाध्यमांना दिली.

लाखनी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घराडे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक लखन उईके अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

चाकणकर यांनी आज दुपारी दोन वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. त्या म्हणाल्या, “हे प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आहे. दोन आरोपींना अटक केली असून एकाचा शोध पोलीस घेत आहेत. लाखनी पोलीस ठाण्यातून महिला निघून गेल्यानंतर तिच्यासोबत सामूहिक अत्याचाराचा प्रकार घडला. यातून पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे लाखनी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना निलंबित करण्यात आले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.” यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील हेसुद्धा उपस्थित होते.

Story img Loader