चंद्रपूर : पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांनी शनिवारला सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे भाजपात प्रवेश केला मात्र अवघ्या चोवीस तासात भाजपाचा दुप्पटा बाजूला ठेवत रविवारी पुन्हा कांग्रेस मध्ये दोन्ही संचालकांनी घरवापसी केली आहे. अशोक साखलवार व प्रफुल लांडे असे घरवापसी केलेल्या संचालकाचे नाव आहे. दोन्ही संचालक हे कांग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मात्र भाजप मध्ये प्रवेश करून काँग्रेस मध्ये आल्याने त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पोंभूर्णा बाजार समिती आधी कांग्रेसच्या हातात होती मात्र सभापती मरपल्लीवार यांनी कांग्रेसला रामराम ठोकून आपल्या दोन संचालकांना सोबत घेऊन भाजपात प्रवेश करून सभापती पद आपल्याकडेच ठेवले होते.तेव्हापासूनच बाजार समितीत धुसफूस सुरू होती.शिवाय पोंभूर्णा भाजपात दोन गट असल्याने दोन्ही गट एकमेकाला भांड्यात पाहात असतात.भाजपाच्या एका गटाने बाजार समितीत भाजपाचा सभापती असतांना बाजार समितीमधील विविध पदांच्या भरती प्रक्रियेवर स्टे आणलेले होते.स्टे आल्याने भरती प्रक्रिया वांद्यात अडकली होती.दि.२२ मार्चला सभापती रवींद्र मरपल्लीवार यांनी बाजार समितीच्या विकासासाठी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी कांग्रेसच्या दोन्ही संचालकांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयात घेऊन गेले होते.

बाजार समितीच्या संदर्भात कोणतीही चर्चा न करता व दिशाभूल करून मुनगंटीवार यांच्या हस्ते भाजप पक्षाचे दुप्पटे संचालक अशोक साखलवार व प्रफुल लांडे या दोघांच्याही गळ्यात टाकून प्रवेश देण्यात आला.भाजपा पक्षात काम करण्याची कोणतीच इच्छा नसणाऱ्या दोन्ही संचालकांनी अवघ्या चोवीस तासात २३ मार्चला काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व मुल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व जिल्हा काँग्रेसचे महासचिव राकेश रत्नावार यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसचा दुपट्टा टाकून घरवापसी केली आहे.याप्रसंगी पोभूर्णा तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष वासुदेव पाल, मुल कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, मुल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले उपस्थित होते.

बाजार समितीच्या काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही सभापती सोबत गेलो होतो.मात्र आमची इच्छा नसताना व आमची दिशाभूल करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आमच्या गळ्यात भाजपचे दुप्पटे टाकण्यात आले.मात्र आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने आम्ही काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे.
प्रफुल लांडे, संचालक कृ.उ.बाजार समिती पोंभूर्णा