लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यात होळीनंतर एक- दोन दिवसांचा अपवाद सोडला तर रोज तापमानात वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच महानिर्मितीचे प्रत्येकी ५०० मेगावॅटचे दोन वीजनिर्मिती संच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. हे दोन्ही संच चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्पातील आहेत. त्यामुळे अचानक विजेची मागणी वाढल्यास वीज पुरावठ्यावरही परिणामाचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
महानिर्मितीच्या चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्पातील बंद संचांपैकी युनिट क्रमांक ५ हा बॉयलर ट्युब लिकेजमुळे बंद असून तो शनिवारी सुरू होण्याची शक्यता आहे. युनिट क्रमांक ९ हा तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. त्याच्याही दुरुस्तीचे काम सुरू आहे. शुक्रवारी (२१ मार्च) राज्याच विजेची मागणी २७,९०२ मेगावॅट होती. त्यापैकी १६,४१० मेगावॅट वीजनिर्मिती राज्यात होत होती तर ११,२४३ मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून मिळत होती.
राज्यातील एकूण वीजनिर्मितीपैकी सर्वाधिक ७,१८१ मेगावॅट वीज महानिर्मितीकडून मिळत होती. त्यात महानिर्मितीच्या राज्यभरातील औष्णिक वीज प्रकल्पातील ५,४०३ मेगावॅट, उरन गॅस प्रकल्पातील २५२ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातील १,४१५ मेगावॅट, सौर प्रकल्पातील १०३ मेगावॅट विजेचा समावेश होता. खासगी प्रकल्पांपैकी राज्याला जिंदलकडून ७९९ मेगावॅट, अदानीकडून १,४५८ मेगावॅट, आयडियलकडून १५३ मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३४७ मेगावॅट वीज मिळत होती.
दरम्यान, राज्यातील विजेची मागणी मध्यंतरी ३० हजार मेगावॅटच्या जवळपास पोहचली होती. आता ही मागणी सुमारे एक हजार मेगावॅटने कमी झाली आहे. त्यामुळे दोन संच बंद पडल्यावरही विपरित परिणाम झालेला नाही. परंतु, अचानक विजेची मागणी वाढल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याचा धोका आहे. महावितरणच्या जनसंपर्क विभागाने मात्र मागणीनुसार आवश्यक तजवीज केल्याचा दावा केला आहे.
महानिर्मितीची वीज निर्मिती क्षमता…
एमएसईबी अर्थात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ म्हणून पूर्वी ओळख असलेले महानिर्मिती किंवा महाजेनको (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित – एमएसपीजीसीएल) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख वीज निर्मिती कंपनी असून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे पूर्ण स्वामित्व असलेली उपकंपनी आहे. १३,२२० मेगावॅट वीज उत्पादनासह हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील भारतातील सर्वात मोठे वीज उत्पादक कंपनी आहे. महाजेनकोद्वारे निर्माण होणारी वीज महाराष्ट्रामध्ये पुरवली जाते. महाजेनको ६ जून २००५ पर्यंत महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा भाग राहिले आहे.